घरमुंबईकर्वे रोडवरील पार्किंगमुक्तचा नारा फेल

कर्वे रोडवरील पार्किंगमुक्तचा नारा फेल

Subscribe

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानक ते ऑपेरा हाऊस या महर्षी कर्वे मार्गावरील बस स्थानकांपासून ते ५० मीटर परिसरांमध्ये वाहने उभी करण्यास बंदी असतानाही या संपूर्ण रस्त्यांवरील एका बाजूला बिनधास्तपणे गाड्या उभ्या केल्या जात आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी ऑपेरा हाऊसच्या दिशेला जाणार्‍या मार्गावर वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगचे आदेश जारी केले. परंतु चर्चगेटच्या दिशेला जाणार्‍या रस्त्यावर बस स्थानक परिसरासह संपूर्ण रस्त्यांवरच मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने कर्वे मार्गावरील पार्किंगमुक्तचा नारा फेल ठरताना दिसत आहे.

मुंबईतील पाच प्रमुख रस्ते पार्किंगमुक्त करण्याची घोषणा केली असून त्यापैकी महर्षी कर्वे रोडवरील बस स्थानकाच्या ५० मीटर परिसरात वाहने उभी करण्यास बंदी करण्यात आली. याठिकाणी वाहने उभी केल्यास चारचाकी वाहनांना १० हजार रुपये तर दुचाकी वाहनांना ५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चगेट रेल्वे स्थानक ते ऑपेरा हाऊस या पर्यंतच्या कर्वे मार्गावर चर्चगेट ते मरिन लाईन्स दरम्यान आयकर भवन परिसर, अवर लेडी ऑफ डॉलर्स हायस्कूल, मरिन लाईन्स रेल्वे स्थानकासमोर तर मरिन लाईन्स ते चर्नीरोड या दरम्यान स.का.पाटील उद्यान बस स्थानक, बीजेपीसी इन्स्टिट्युट अँड ज्युनियर कॉलेज या बस स्थानकाच्या परिसरांना वाहनांनी विळखा घातलेला आहे. त्यापुढील चर्नीरोड रेल्वे स्थानकासमोरील ऑपेरा हाऊसकडे जाणार्‍या मार्गावरही मोठ्याप्रमाणात वाहने उभी राहत आहेत.

- Advertisement -

मुंबई महापालिकेने या मार्गावरील दोन्ही बाजूंना बस स्थानकांच्या ५०मीटर परिसरात वाहने उभी करण्यास बंदी घातली आहे. तर वाहतूक पोलिसांच्या मदतीने पालिकेने चर्चगेटहून ऑपेरा हाऊसकडे जाणारी रस्त्यांची बाजू ही पार्किंगमुक्त जाहीर केली आहे. त्यामुळे या बाजूला असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर आहे. परंतु दक्षिणेच्या बाजुच्या रस्त्यावरील बाजूला सरसकट सर्वच बाजूला वाहने उभी होत असल्याने महापालिकेच्या कारवाईला चालक जुमानत नसल्याचे दिसून येते. बेस्ट बसच तिकीट तपासनीस यांनी, बस स्थानकाच्या परिसरात वाहने सर्रास उभी होत असून आम्ही तक्रार केल्यानंतरच महापालिकेच्यावतीने कारवाई केली जाते. त्यामुळे तक्रारींशिवाय महापालिकेच्या पथकाची या वाहनांवर कारवाई होत नसल्याचेही समोर येते.

महर्षी कर्वे मार्ग हा ए व सी विभागात मोडत आहे. या मार्गावरील उत्तरेकडील बाजू ही पूर्णपणे पार्किंगमुक्त करण्यात आली आहे. त्याप्रमाणे कारवाई केली जाते. परंतु दक्षिणेच्या बाजुला जाणार्‍या रस्त्यांवर वाहने उभी असतात ही बाब सत्य असून त्यावरील कारवाईबाबत माहिती जाणून घेवू.
-विनायक विस्पुते, सहायक आयुक्त, सी विभाग

- Advertisement -

महर्षी कर्वे मार्गावरील बस स्थानकाच्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांवर विभाग कार्यालयाच्यावतीने कारवाई केली जातच होती. परंतु आपण तीन दिवसांपूर्वीच सहायक आयुक्तपदाचा भार स्वीकारला आहे. त्यामुळे या मार्गावरील कमर्शियल वाहनांवरील कारवाईचा आढावा घेवून यापुढे ही कारवाई अधिक कडक केली जाईल.
-चंदा जाधव, सहायक आयुक्त, ए विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -