Virar Fire : हॉस्पिटल आगीत पती गमावल्याच्या धक्क्याने पत्नीला ह्दयविकाराचा झटका, दोशी दाम्पत्याचा दुर्दैवी अंत

वसईतील कार्डिनल ग्रेसस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असताना त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

Virar covid hospital fire Wife suffers heart attack after husband dies in fire, couple dies
Virar Fire : हॉस्पिटल आगीत पती गमावल्याच्या धक्क्याने पत्नीला ह्दयविकाराचा झटका, दोशी दाम्पत्याचा दुर्दैवी अंत

नाशिकच्या डॉ झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर शुक्रवारी पहाटे ३:३० वाजताच्या दरम्यान विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली या आगीत आतापर्यत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्ण आगीत दगावल्याने नातेवाईकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच आगीत कुमार किशोर दोशी नावाच्या एका व्यक्तीचाही मृत्यू झाला. दुर्देवी बाब ही की आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रुग्णालयाच्या आगीने दोशी दामप्त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

विरार पश्चिमच्या विजय वल्लभ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) कुमार दोशी यांच्यावर कोरोना उपचार सुरु होते. शुक्रवारी पहाटे रुग्णालयाला लागलेल्या आगीत कुमार यांचाही होरपळून मृत्यू झाला. कुमार यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या पत्नी चांदनी दोशी यांना सांगण्यात आली. रुग्णालयाच्या भीषण आगीत आपला नवरा जळून खाक झाला आहे यावर त्या विश्वास ठेवायला तयार नव्हत्या. नवऱ्याच्या मृत्यूचा धक्का पचवू न शकल्याने त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी वसईतील कार्डिनल ग्रेसस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण उपचार सुरू असताना त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

नाशिकच्या दुर्घटनेनंतर विरारमध्ये घडलेल्या या घटनेमुळे रुग्णांचा नातेवाईकांमध्ये तीव्र संपात पहायला मिळत आहे. विरारच्या या कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत होरपळून मृत्यू झालेल्या १३ रुग्णांमध्ये ५ महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. विजय वल्लभ या चार मजली रुग्णालयात एकूण ९० रुग्ण उपचार घेत होते त्यातील १७ कोरोनाबाधित रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. रुग्णालयातील इतर रुग्णांना त्वरित दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


हेही वाचा – विरारमधील कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीचं कारण स्पष्ट; मृतांची यादी समोर