घरमुंबईनवी मुंबई महापलिकेत पाणी पेटले

नवी मुंबई महापलिकेत पाणी पेटले

Subscribe

पालिकेचे प्रस्ताव जर तुम्ही थांबवले तर तुमची कामे करणार नाही, अशी धमकावणी आयुक्त करत असल्याचा गौप्यस्फोट स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत केल्याने एकच खळबळ माजली. त्याचवेळी सर्व समिती सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. याच प्रकरणामुळे सत्ताधारी व प्रशासनाचा चोर पोलिसाचा खेळ चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्टी भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत असतानाही सदरील प्रस्ताव पटलावर न आणल्यामुळे सत्ताधार्‍यांचा पारा चढला आणि त्याचवेळी दोघांमधील वाद समोर आला.

तुर्भे भागात एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत पाणी विषयावरून चर्चा सुरू असताना महापालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करीत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

- Advertisement -

सीबीडी सेक्टर 1 येथील पाणीपुरवठा पंपहाउस येथे 22 किलोवॅट वीजवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने सद्यस्थितीतील वीजवाहिनी बदलून 11 किलोवॅट करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत चर्चेसाठी आला होता, त्यावर चर्चा करताना नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी वाशी सेक्टर 3 व सेक्टर 4 मधील महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांना गळती लागल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून देत, यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगितले. तसेच गेल्या दोन वर्षांपासून प्रश्नाकडे पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनी विद्युत विभागाने गेल्या सहा महिन्यांत तीन वेळा दुरु स्तीची कामे काढली आहेत, तरीदेखील चढवावरील भागात पाणी येत नसल्याचे सांगितले. त्याचवेळी स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी झोपडपट्टी भागातदेखील पाण्याच्या खूप समस्या असून नागरिक घेराव घालत असल्याचे सांगितले.20 वर्षे जुन्या पाईप लाइन असून चढावावरील भागात पाणी चढत नसल्याचे सांगत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होताना शटडाउनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तुर्भे भागातील नागरिकांना मोरबेचे पाणी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित यावेळी त्यांनी केला.

- Advertisement -

नगरसेवक शिवराम पाटील यांनी काही ठिकाणी पाणी ओव्हरफ्लो होईपर्यंत पाणीपुरवठा केला जातो, तर गरीब नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप केला. तसेच 24 तास पाणी नको दिवसातून दोन तास पाणी द्या, अशी मागणी केली. एमआयडीसीतर्फे तुर्भे भागाला पाणीपुरवठा केला जातो, परंतु शटडाउन आणि इतर कारणांमुळे पाणीपुरवठा होण्यास अनेक अडथळे येत असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या विषयाचे गांभीर्य प्रशासनाने लक्षात घेऊन काही दिवसांत पाण्याची समस्या दूर करावी अन्यथा तुर्भेमधील प्रभाग क्रमांक 68, 69, 70 आणि प्रभाग क्र मांक 73 मधील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पाणीप्रश्न हा विषय गंभीर आहे. या समस्या आयुक्तांसमोर मांडण्यात येतील. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
महावीर पेंढारी, अतिरिक्त आयुक्त, मनपा

माझ्या विभागात कमी दाबाने पाणी येत आहे. अनेक वर्षे पाठपुरावा करून थकले. मात्र पाणी गळतीवर अधिकारी काहीही करत नाहीत. 25 वर्षांपूर्वीचे सिडकोचे पाईप आहेत. ते बदलण्याची गरज आहे.
दिव्या गायकवाड, स्थायी सदस्य, वाशी

15 वर्षे झाले चोवीस तास पाणी देऊ असे ऐकत आलो आहोत. फक्त 2 ते 3 तास पाणी येत आहे. शहरी भागात भरपूर पाणी, मात्र एलआयजी व झोपडपट्टी भागात पाणीच नाही अशी अवस्था आहे.
शिवराम पाटील, सदस्य, कोपरखैरणे.

कोणतेही काम वैयक्तिक नसते. पालिकेचे जेवढे प्रस्ताव असतात हे पालिकेचेच असतात. नागरिकांची कामे होणारच, मात्र त्यात अनेकदा खोडा घातला जातो. पाण्याचा प्रश्न लगेच सोडवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.    रामस्वामी एन., आयुक्त नवी मुंबई महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -