घरमुंबईजलवाहिनी फुटल्यामुळे परळमध्ये पाण्याची बोंब!

जलवाहिनी फुटल्यामुळे परळमध्ये पाण्याची बोंब!

Subscribe

परळमध्ये ४८ इंचाची जववाहिनी फुटली आहे. त्यामुळे परळ पूर्व भागात राहणाऱ्या नागरिकांना गुरूवारी सायंकाळी पाण्याविना रहावे लागणार आहे. शुक्रवारी सकाळी जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येईल. त्यानंतर विभागात पाणीपुरवठा केला जाईल, असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

परळ पूर्वेकडील परळ पुलाजवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ४८ इंचाची जलवाहिनी गुरूवारी पहाटेच्या सुमारास फुटली. त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया गेले. शिवडी, केईएम, परळ परिसरातील पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे. जलवाहिनी फुटल्यानंतर स्थानिकांनी पालिकेला याबाबतची माहिती दिली. दुपारी पालिकेच्या जलविभागाचे कर्मचारी परळमध्ये दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जल विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.

शुक्रवारी पाणी येणार!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेकडील ४८ इंचाची जलवाहिनी पहाटे ६.३० च्या दरम्यान फुटली. त्यामुळे परिसरात पाणीच पाणी झाले. या घटनेनंतर परळ पुलावरुन जाणारी वाहतूक काही वेळ बंद करण्यात आली होती. गुरुवारी रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन शुक्रवारी सकाळपर्यंत या विभागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

जलमय परळ

सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात परळच्या हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. या परिसरात पाण्याचे तळे साचते. दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हिंदमाता परिसरात नेहमीप्रमाणे पाणी तुंबले. गुरुवारी मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती, तरीदेखील परळमध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी साचले. याचा परळवासियांना मन:स्ताप सहन करावा लागला.

वाहतूक कोंडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हा परळ पूर्व भागातील महत्त्वाचा आणि सर्वाधिक वापर होणारा रस्ता आहे. या मार्गालगत जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र पाणी साचले होते. त्यामुळे येथील वाहतुकीत बदल करण्यात आले होते. परंतु मुख्य रस्ता बंद झाल्याने स्थानिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. तसेच पादचाऱ्यांनाही मोठा फटका बसला होता. गुरूवारी सायंकाळपर्यंत जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. परंतु पाण्याचा निचरा झाल्यामुळे सायंकाळनंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -