मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक झालेला विनायक शिंदे आहे कोण?

who is vinayak shinde in mansukh hiren death case assault
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटक झालेला विनायक शिंदे आहे कोण?

गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. यामध्ये सचिन वाझे यांचे अनेक कारणामे उघडकीस आले असून या प्रकरणातून आश्चर्यकारक गोष्टी समोर येत आहेत. आज मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. जरी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला असला तरी, या प्रकरणात आज एटीएसने दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये निलंबित पोलीस कॉन्स्टेबल आणि एका बुकीचा समावेश आहे. निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात विनायक शिंदे नाव आल्यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. विनायक शिंदेसह नरेश गोर यांना आज ठाणे कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

कोण आहे विनायक शिंदे?

नोव्हेंबर २००६ मध्ये लखनभैया बनावट चकमक प्रकरणात दोषी आढळून आल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदेला निलंबित केले होते. लखनभैया बनावट चकमकीतील प्रमुख आरोपी प्रदिप सुर्यवंशी याचा विनायक शिंदे खास होता. पण लखनभैया चकमक प्रकरणातून विनायक शिंदे मे २०२०मध्ये पॅरोलवर बाहेर आला होता. वर्षभरापासून विनायक शिंदे पॅरोलवर बाहरेच होता.

सचिन वाझे याचे प्रदिप सुर्यवंशी आणि विनायक शिंदे हे एकदम खास आहेत. सचिन वाझेसोबत प्रदिप सुर्यवंशी आणि विनायक शिंदेने अंधेरी सीआययू युनिटमध्ये एकत्रित काम केले आहे. माहितीनुसार, मनसुख हिरेन यांना तावडे नावाने जो फोन करण्यात आला होता, तो फोनवरील व्यक्ती तावडे नसून विनायक शिंदे असल्याचे बोलले जात आहे. आता मनसुख हिरेन संशयित मृत्यूप्रकरणात सचिन वाझेच्या सांगण्यावरून विनायक शिंदे याने एक बुकी आणि इतर काही आरोपींना एकत्र केल्याचा संशय एटीएसला आहे.

तसेच विनायक शिंदे सचिन वाझेला वारंवार भेटत असे. अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी ठेवण्याचा कट जानेवारी महिन्यात मुंबई पोलीस आयुक्तालयातच झाल्याचे समोर आले आहे. विनायक शिंदे फेब्रुवारी २०२१मध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयात आला होता. यादरम्यान सचिन वाझेची भेट घेऊन तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्चा चालली होती. विनायक शिंदे वाझेला इथेच नाहीतर सीआययू कार्यालयात सुद्धा भेटत असे. वाझेच्या केबिन बाहेरीच्या पोलिसांकडून शिंदे पोलिसांचा लोगो असलेला मास्क आणि पोलीस लिहिलेली निळी पट्टी मागितली होती. दरम्यान दुसरा अटक आरोपी नरेश धरे या क्रिकेट बुकीने ५ मोबाईल सिम कार्ड घेऊन सचिन वाझे यांना दिल्याची माहिती एटीएसने दिली आहे. त्यामुळे याप्रकरणात अशाप्रकरणाचे खुलासे होत असल्यामुळे पोलीस दलात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

काय आहे लखनभैय्या एन्काऊंटर प्रकरण?

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार असल्याच्या संशयावरून कुख्यात गुंड लखनभैयासह त्याचा साथीदार अनिल भेडा या दोघांना नोव्हेंबर २००६ मध्ये प्रदीप शर्मा यांच्या पथकाने वाशी येथून उचलले होते. त्यानंतर वर्सोवा येथील नाना-नानी पार्कजवळ लखनभैयाचा एन्काऊंटर करण्यात आला होता. या घटनेनंतर लखनभैयाच्या भावाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सत्र न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्यायालयाने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले होते. दंडाधिकारी चौकशीत लखनभैयावर अत्यंत जवळून मारण्याच्या हेतूनेच गोळीबार झाल्याचे उघड झाले होते.

त्यानंतर २००९ साली न्यायालयाने एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. एसआयटीने तात्काळ कारवाई करून २०१० मध्ये प्रदीप शर्मा, प्रदीप सुर्यवंशी यांच्यासह १४ पोलिसांना अटक केली. लखनभैयाची हत्या जनार्दन भणगे या त्याच्याच साथीदाराने सुपारी देऊन घडवून आणल्याचे एसआयटीच्या चौकशीतनंतर उघड झाले. लखनभैयाच्या हत्येचा प्रमुख साक्षीदार असलेला अनिल भेडा न्यायालयात साक्ष देण्याआधी अचानक बेपत्ता झाला. महिन्याभरानंतर त्याचा मृतदेह सापडल्याने प्रकरणाचा पेच आणखीच वाढला होता. १२ जुलै २०१३ रोजी याप्रकरणातून वरिष्ठ अधिकारी प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करताना सहा अधिकारी आणि सात अंमलदारांसह २१ जणांना न्यायालयाने दोषी धरले होते. यामध्ये विनायक शिंदे याचाही समावेश होता.


हेही वाचा – गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय सोमवारी – शरद पवार