घरमुंबई...आणि सोमवारी सकाळी विरार स्टेशनवर जन्माला आली ‘लोकल बेबी’

…आणि सोमवारी सकाळी विरार स्टेशनवर जन्माला आली ‘लोकल बेबी’

Subscribe

आज सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळेस विरार डहाणू लोकल ट्रेनमध्ये एका महिलेने लोकलच्या डब्यातच बाळाला जन्म दिला.

वेळ सकाळी ९ ची. मुंबईकरांच्या धावपळीची. ठिकाण विरार स्टेशन. प्लॅटफार्म क्रमांक ३ ए वर विरारडहाणू लोकल आलेली असते. त्यातच एक तातडीची उदघोषणा होते, डहाणूला जाणाऱ्या ट्रेनमध्ये मदतीची आवश्यकता आहे, जीआरपी महिला कॉन्टेबलने तातडीने तिकडे जावे’. त्यानुसार तेथे कर्तव्यावर असलेल्या प्रियंका लोणारे, अर्चना घटका, यांच्यासह हेडकॉस्टेबल दीपक पाटील, शैलेश लाखत तातडीने प्लॅटफार्म क्रमांक ३ ए कडे धाव घेतात.

डहाणू लोकलच्या कोच क्रमांक ५०४८ सी या दिव्यांगांच्या डब्यात एका महिलेला प्रसुतीच्या कळा सुरू झालेल्या असतात. सोनी अजय पटेल नावाची ही २२ वर्षीय महिला सफाळे येथील नरोडा मालकारी पाडा येथे जाण्यासाठी निघालेली असते. मात्र ट्रेनमध्ये बसताच तिला प्रसवकळा सुरू होतात. ड्युटीवर असलेले पोलिस कर्मचारी तातडीने जवळच असलेल्या सफाई कर्मचारी महिलेला बोलावून डब्यातील महिलेची विचारपूस करायला सांगतात. ‘ ती आई होणार आहे, असा निरोप संबंधित कर्मचारी महिलेने दिल्यानंतर डॉक्टरांसाठी शोधाशोध सुरू होते.

- Advertisement -

पण वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसल्याचे समजते. इकडे डब्यातील महिलेला प्रसवकळा असह्य झाल्याने पोलिस आणि इतर कर्मचारी महिलांच्या मदतीने तिची डब्यातच प्रसुती केली जाते. प्रसुती सुखरूप होऊन एका गोंडस मुलीला ती जन्म देते. प्लॅटफॉर्मवरील सगळ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा निश्वास आणि आनंद एकाच वेळी पसरतो. त्यानंतर या महिलेला तिच्या पतीच्या मदतीने जवळच असलेल्या विरार ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येते. मात्र येथील कर्मचारी आणि प्रवाशांमध्येही दिवसभर चर्चा असते ती या ‘लोकल बेबी’चीच !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -