मुंबईकरांना सृदृढ आरोग्यासाठी 1 जूनपासून योगा प्रशिक्षण

मुंबईकरांना सृदृढ आरोग्यासाठी आता मुंबई महापालिका 'शिव योगा सेंटर' च्या माध्यमातून येत्या 1 जूनपासून योगाचे मोफत प्रशिक्षण देणार आहे. मात्र योगाचे धडे घेण्यासाठी किमान ३० जणांचा एक गट असणे आवश्यक आहे.

मुंबईकरांना सृदृढ आरोग्यासाठी आता मुंबई महापालिका ‘शिव योगा सेंटर’ च्या माध्यमातून येत्या 1 जूनपासून योगाचे मोफत प्रशिक्षण देणार आहे. मात्र योगाचे धडे घेण्यासाठी किमान 30 जणांचा एक गट असणे आवश्यक आहे. महापालिकेने (BMC) योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक असलेल्या संस्थांकडून टेंडर मागवले आहे. या योगाचे धडे देणाऱ्या एका प्रशिक्षकाला दोन तासांसाठी एक हजार रुपये मानधन पालिकेतर्फे देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात योगा प्रशिक्षण देण्यासाठी 25 कोटीं रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, मुंबईत एकूण 200 ‘शिव योग’ केंद्रे (shiv yoga center) सुरू केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 100 केंद्रे सुरू करण्यात येतील. यासंदर्भातील माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी दिली.

मुंबईत हवेतील प्रदूषण वाढले

सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात बदल घडत आहेत. मुंबईत हवेतील प्रदूषण वाढले आहे. वातावरणात होणाऱ्या विविध बदलांमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये यासाठी पालिका विविध उपाययोजना करते. तसेच, विविध उपक्रमही राबवते. पालिकेने आणखीन एक पाऊल पुढे टाकत मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी ‘शिव योगा सेंटर’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

तरुणांमध्येही योगाची जनजागृती

एखाद्या व्यक्तीला आपल्या आजारावर मात केल्यानंतर आरोग्य उत्तम राहावे यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. त्या दृष्टीने मुंबई महापालिकेने सर्वसामान्यांसह वृद्ध, सहव्याधी असणारे आणि तरुणांमध्येही योगाची जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. ही योगा केंद्रे सार्वजनिक सभागृहे, पालिका किंवा खासगी शाळा, मंगल कार्यालये, पालिकेच्या जागा, सार्वजनिक विकाणी चालविण्यात येतील. शिव योगा सेंटर सुरु करण्यासाठी योग्य ती प्रक्रिया सुरु असून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले.


हेही वाचा – नवी मुंबईतील ‘या’ भागांत 24 मे रोजी पाणीपुरवठा बंद