घरमतप्रवाहभाग २७ - महेंद्रसिंग धोनीच्या निवडीचा रंजक किस्सा...!

भाग २७ – महेंद्रसिंग धोनीच्या निवडीचा रंजक किस्सा…!

Subscribe

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी "साहेब माझा विठ्ठल" या सदराखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक, राजकीय जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या घटनांवर आधारीत लेख लिहिले आहेत. त्या लेखांची ही मालिका.

२००८ चा तो काळ होता. BCCI चे अध्यक्ष होते पवार साहेब. भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यावेळी संघाचा कर्णधार होता आपल्या सर्वांचा आवडता खेळाडु राहुल द्रविड. पवार साहेब देखील BCCI अध्यक्ष या नात्याने आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर होते.

दौरा सुरू असताना एक दिवस अचानक राहुल द्रविड पवार साहेबांना भेटायला आला. साहेब ब्रेकफास्ट करत बसले होते. साहेबांनी द्रविडचं स्वागत केलं आणि अचानक येण्याचं प्रयोजन विचारलं. द्रविड साहेबांना, “मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा…!” असे म्हणाला. चालू दौऱ्यात द्रविड सारखा खेळाडू अशी मागणी करतोय हे पाहून साहेबांना नाही म्हटलं तरी थोडा धक्का बसला. यावर साहेबांनी द्रविडला विचारले की,
“इंग्लंड दौरा सुरू असताना, आणि या दौऱ्यावर तू कॅप्टन असताना असा तडकाफडकी निर्णय कसा घेता येईल…? दुसरं म्हणजे हे निर्णय मी घेत नाही. यासाठी तू निवड समितीकडे जायला हवं. कारण हा निर्णय पूर्णतः निवड समितीचा असतो…!”

- Advertisement -

तरीदेखील द्रविडने साहेबांकडे, “मला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मोकळीक द्या, माझ्या व्यक्तिगत कामगिरीवर या जबाबदारीमुळे परिणाम होतो,” हा धोशा कायम ठेवला. तो ऐकत नाही म्हटल्यावर साहेबांनी द्रविडला पर्यायी कर्णधाराचं नाव सुचवायला सांगितले. द्रविडणे यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव साहेबांना सुचवलं. साहेबांनी मग सचिनला कर्णधारपदाच्या जबाबदारीबद्दल विचारलं. सचिनने देखील कामगिरीचं कारण देत कर्णधारपद स्वीकारण्यास प्रांजळपणे नकार दिला. दौरा सुरू होता आणि या दौऱ्यात संघाचे दोन्ही दिग्गज खेळाडू कर्णधारपदासाठी तयार नव्हते. शेवटचा उपाय म्हणून साहेबांनी मग त्या दोघांनाच योग्य व्यक्तीचं नाव सुचवायला सांगितले. आणि आश्चर्य म्हणजे दोघांनी मिळून एकच नाव घेतले. ते नाव होत महेंद्रसिंग धोनी.

साहेबांनी यावर विचार केला. सचिन आणि द्रविड सारखे खेळाडू धोनीचं नाव घेतायत म्हटल्यावर साहेबांनी मोठ्या विश्वासाने हे नाव निवडसमितीला सुचवलं. दिलीप वेंगसरकर त्यावेळी निवड समितीचे अध्यक्ष होते. धोनीच्या नावावर सचिन, राहुल आणि खुद्द BCCI अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती. निवड समितीने धोनीला कर्णधार बनवत असल्याचा निर्णय जाहीर केला…! पुढे याच महेंद्रसिंग धोनीने भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात इतिहास घडवला.

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -