घरपालघरआंब्याची बाग जळून खाक

आंब्याची बाग जळून खाक

Subscribe

आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर संपूर्ण बाग आगीच्या भक्षस्थानी गेली. यामुळे म्हात्रे यांच्या मालकीची आंब्याची झाडे पूर्णतः जळून खाक झाली.

पालघर: पालघर तालुक्याच्या पूर्वेकडील वाकसई बेंदलपाडा भागात एका शेतकर्‍याच्या आंबा बागेला अचानक आग लागल्याने आंबा बाग जळून खाक झाला. या आगीमुळे बागेसह इतर आदिवासी शेतकर्‍यांची शेत जळाल्याची माहिती समोर येत आहे. वाकसई भागामध्ये मोठ्या प्रमाणात बागायत व शेतजमीन आहे. या ठिकाणी मनोहर म्हात्रे या बागायतदार शेतकर्‍याची मोठी आंब्याची बाग असून या बागेमध्ये सुमारे 300 च्या जवळपास आंब्याची मोहोर आलेली झाडे होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास बाग व लगतच्या परिसरात अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर संपूर्ण बाग आगीच्या भक्षस्थानी गेली. यामुळे म्हात्रे यांच्या मालकीची आंब्याची झाडे पूर्णतः जळून खाक झाली.

ऐन आंबा फळ हंगामाच्या वेळेतच पाच एकर क्षेत्रावरील ही झाडे जळून खाक झाल्याने म्हात्रे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यासोबत आजूबाजूच्या आदिवासी खातेदारांच्या शेतजमिनींना आग लागल्यामुळे त्यांची शेतजमीन ही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग लागल्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. वाकसई गावातील काही शेतकर्‍यांनी फळ पिक विमा भरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या गावाची नोंद तहसील दप्तरी बदलल्याने बँकेमध्ये विमा भरण्यासाठी गावाच्या नावाची यादी ऑनलाईनवर दिसत नव्हती. म्हणून येथील शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहिले होते. आता नुकसान झाल्यामुळे झालेली नुकसानी विम्याविना भरून कशी काढणार असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर पडला असून कृषी विभागाच्या चुकीमुळे पिक विमापासून वंचित असलेल्या शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -