घरपालघरभाईंदरमध्ये दैनंदिन कचरा संकलन निविदेवरून वाद

भाईंदरमध्ये दैनंदिन कचरा संकलन निविदेवरून वाद

Subscribe

दोन झोनमध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. झोन १ मध्ये जुनीच कंपनी मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट व झोन २ मध्ये मे. कोणार्क इन्फ्रा यांना कार्यादेश देण्यासाठी पात्र करण्यात आले आहे.

इरबा कोनापुरे ,भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत दैनंदिन कचरा साफसफाई आणि संकलन करून वाहतूक करण्याच्या निविदेवरून वाद उभा राहिला आहे. निविदे प्रक्रियेविरोधात ठेकेदार कंपनीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून येत्या १७ जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे.मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील घनकचरा विभागामार्फत दैनंदिन साफसफाई व कचरा संकलन करून वाहतूक करण्याची निविदा मागवून कार्यादेश देण्याअगोदरच आर अँड बी इन्फ्रा कंपनीने निविदा प्रक्रियेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत कार्यादेश न-देण्यासाठी स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन स्थगिती न-देता १७ जानेवारी २०२३ पर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दोन झोनमध्ये निविदा काढण्यात आल्या होत्या. झोन १ मध्ये जुनीच कंपनी मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट व झोन २ मध्ये मे. कोणार्क इन्फ्रा यांना कार्यादेश देण्यासाठी पात्र करण्यात आले आहे.

त्याविरोधात आर अँड बी इन्फ्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट काळ्या यादीत होती. झोन दोन मधून ठेकेदारांनी तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर माघार घेतली आणि त्याचा फायदा कोणार्क इन्फ्रा यांना करून दिला आहे. मे. कोणार्क इन्फ्रा निविदेच्या अटीशर्तीत बसत नसतानाही त्यांनी दुसर्‍या कंपनीचे अनुभव कागदपत्रे लावून निविदा भरल्याचे त्यांनी म्हटले आहे..
दैनंदिन साफसफाई व कचरा संकलनसाठी झोन एकमध्ये ९०० कामगार व झोन दोन मध्ये १३०० कामगार असणार आहेत. त्यांचा दर हा महापालिकेने १२४९ दिलेला असतानाही झोन एकमध्ये ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट यांनी प्रत्येकी लेबर १४९४ हा दर व झोन दोनमध्ये कोणार्क इन्फ्रा यांनी १५०२ दर भरला होता. त्यानंतर महापालिकेच्या वाटाघाटी दरानंतर प्रत्येकी लेबर १३९९ प्रमाणे निश्चित केला आहे. तर त्यासोबतच प्रति दिवस भाडे प्रमाणे ७ टनाच्या कॉम्पॅक्टरसाठी १४ हजार ४०० रुपये आणि ५ टनाच्यासाठी १३ हजार २०० रुपये, ३.३ टनाच्या ७२०० रुपये दर असणार आहे. त्यात तीन लेबर , एक ड्रायव्हर व गाडी देखभाल दुरुस्ती ही त्यांची असणार आहे. निविदा अटीशर्तीनुसार दरवर्षी १० टक्के वाढ होणार आहे. याकामासाठी झोन एकमध्ये वर्षाला ६३ कोटी आणि झोन दोनमध्ये ९३ कोटी रुपये खर्च होणार आहे.

- Advertisement -

सध्या महापालिकेची २४ वाहने आहेत. महापालिकेत २५३२ सफाई कामगार व १४९ गाड्या आहेत. त्यात ८४ मोठे ७ टनाचे कॉम्पॅक्टर व ३३ मिनी ३ टनाचे कॉम्पॅक्टर ओला व सुखा कचरा गोळा करणार्‍या गाड्या आहेत. महापालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या मोठ्या २४ गाड्या त्यात १८ ह्या सात टनाच्या व ६ गाड्या ३ टनाच्या असणार आहेत. शहरातील झोपडपट्टी व अरुंद रस्ते असलेल्या ठिकाणी जाऊन सहजरीत्या कचरा गोळा करण्यासाठी लहान ३२ गाड्या दीड टनाच्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून त्या गाड्याही लवकरच महापालिकेच्या वतीने खरेदी केल्या जातील. २०१२ साली मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट या ठेकेदाराला पाच वर्षासाठी ठेका देण्यात आला होता. २०१७ साली ठेका संपल्यानंतरही तत्कालीन सत्ताधारी भाजपने २०१७ ते २०२२ पर्यंत सदरील ठेकेदाराला मुदतवाढ देत काम चालू ठेवले होते. सदरील ठेकेदाराला मुंबई पालिकेने काही कालावधीसाठी काळ्या यादीत टाकले होते. तरीही मीरा भाईंदर महापालिकेत मात्र राजरोसपणे काम करत होता. त्यात अनेक त्रुटी असतानाही प्रशासनाने त्यावर कारवाई केलेली नव्हती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -