इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये वृक्षतोड; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा प्रकल्प

शिवसेनेच्या एका बड्या राजकीय नेत्याच्या प्रकल्पासाठी इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर मातीचा भरावही केला जात असल्याची बाब पर्यावरणप्रेमींनी उजेडात आणली आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या चेने गाव हद्दीत शिवसेनेच्या एका बड्या राजकीय नेत्याच्या प्रकल्पासाठी इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर मातीचा भरावही केला जात असल्याची बाब पर्यावरणप्रेमींनी उजेडात आणली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेकडून झाडे तोडल्यानंतर हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाने २०१६ साली संपूर्ण चेने गाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असल्याने तसेच त्याठिकाणी बिबट्या, चार शिंगाचे हरिण, जंगली डुकरे, ससे, जंगली मांजरे व मोर यासह सर्व औषधी वनराई असल्याने हा परिसर इको सेन्सेटिव्ह झोन (पर्यावरण संवेदनशील क्षेत्र) म्हणून घोषित केलेला आहे. असे असतानाही महापालिकेकडून त्याठिकाणी बंगले, इमारती, शाळा बांधण्याची परवानगी दिलेली आहे. आता शिवसेनेच्या ठाण्यातील एका बड्या नेत्याच्या प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी न घेता इको सेन्सेटीव्ह झोनमधील शंभरहून अधिक झाडे तोडल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनीच अधिवेशनात शहरात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. स्वतःच्या प्रकल्पासाठी शेकडो झाडांची कत्तल पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात केली असेल आणि अजून करणार असतील, तर शहराची फारच वाईट परिस्थिती आहे, असे म्हणावे लागेल. याप्रकरणी केंद्र शासन व राज्य शासनाचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे कारवाईची मागणी करणार आहे.
– प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद  

याप्रकरणी स्थानिकांनी व पर्यावरणप्रेमींनी तक्रारी केलेल्या असताना जागा मालक यांच्यावर गुन्हा दाखल न-करता जागा मालकांनी आमच्या जमिनीत अन्य व्यक्तींनी येऊन झाडे तोडल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. एरव्ही स्वतःहून झाडे तोडल्याचा गुन्हा दाखल करत असलेल्या महापालिकेने याप्रकरणाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, मे. अनिष अँड असोसिएट यांनी परवानगी मागितल्यानंतर चेने येथील सर्वे न. ९७, ९८ मध्ये परिसरातील ९६ झाडे कापण्याची जाहिरात महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेची वृक्ष कापणी वादात सापडली आहे. झाडे कापण्यासाठी परवानगी देण्यात येऊ नये, यासाठी शहरातील अनेक सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिकांनी विरोध करत प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

या जागेवर झाडे कापण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नागरिकांच्या तक्रारीचा विचार करून तसेच सर्व नियमांचे पालन करून अंतिम निर्णय घेतला जाईल.
– दिलीप ढोले, आयुक्त, मिरा भाईंदर महापालिका

या जागेत जुनी व मोठमोठी आंब्याची तसेच इतर झाडे आहेत. येथे माती उत्खननासाठी परवानगी घेतली होती. परंतु त्या जागेत उत्खनन न करता मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात आला आहे. तसेच झाडे कापण्यासाठी परवानगी मिळण्याआधीच अनेक झाडे कापण्यात आली आहेत, असा तलाठ्यांनी अप्पर तहसिलदार यांना अहवाल सादर केला आहे.

महाविकास आघाडी सरकार म्हणजे स्वतःचे पाप ठेवायचे झाकून आणि इतरांचे बघायचे वाकून अशीच परिस्थिती आहे. महापालिकेने तात्काळ दिलेली बांधकाम परवानगी रद्द करून शहराला लाभलेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा सौंदर्य किनारा जपून ठेवायचा असताना त्याचा नाश करणे म्हणजे आमदार प्रताप सरनाईक हे पर्यावरणाच्या मुळावर उठल्याचे दिसून येत आहे.
– रवी व्यास, जिल्हाध्यक्ष, भाजप

हेही वाचा –

आता नाना पटोले अयोध्या दौरा करणार?, अयोध्येतील महंत बृजमोहन दासकडून निमंत्रण