करांजे गावातील महिलांना कापडी पिशव्यांतून रोजगार

संस्थेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण व नंतर शिलाई मशीन देउन त्यांना अधिक बळ देखील देण्यात आले शिवाय शिलाई साहित्य देऊन महिलांना कामासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

वाडा : वाडा तालुक्यातील करांजे गावातील बचतगटांद्वारे महिलांनी पर्यावरण रक्षणासाठी सकारात्मक पाऊल उचलले असून त्यांनी उत्पादीत केलेल्या अतिशय सुंदर कापडी वस्तूंच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होत आहे. पूर्णपणे आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावातील महिलांचा हा आदर्श कौतुकास्पद असून लोकांनी देखील त्यांच्या या उपक्रमाला बळ देणे गरजेचे आहे. सेवा वर्धिनी नावाची संस्था मागील २५ वर्षांपासून वाडा तालुक्यातील विविध भागात अनेक उपक्रम राबवित असून तालुक्यातील पर्यावरणाची होत असलेली हानी व करांजे गावातील महिलांची बेरोजगारी बघून या घटकांसाठी काहीतरी काम करण्याचा त्यांचा मानस होता. नेगल वारली आर्ट सेंटर नावाने या गावात ७ महिलांचा सहभाग असलेल्या एका बचतगटाच्या माध्यमातून कापडी वस्तूंची निर्मिती करण्याची सुरुवात २०१७ साली सुरू झाली. संस्थेच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण व नंतर शिलाई मशीन देउन त्यांना अधिक बळ देखील देण्यात आले शिवाय शिलाई साहित्य देऊन महिलांना कामासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

प्लास्टिक वस्तूंना पर्याय उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील महिलांनी पिशवी, उशी कव्हर, वॉल हँगिंग, टेबल टॉप, बेडशीट, शाल, टॉप , पर्स, मोबाईल पॉकेट अशा असंख्य वस्तू अतिशय सफाईदारपणे तयार केल्या आहेत. काही तरुणींनी या वस्तूंवर सुरेख वारली चित्रकला चित्रित करून वस्तूंना बोलके व अधिक आकर्षक बनविले आहे.बचत गटांच्या माध्यमातून एकत्रितपणे काम केल्याने महिलांना घरकाम सांभाळून चांगला रोजगार उपलब्ध झाला असून स्वतःच्या कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण झाल्याचा अभिमान त्यांना वाटत आहे. कोरोना काळात या महिलांच्या कामाला ब्रेक मिळाला असला तरी आता त्या नव्या जोमाने काम करीत असून करांजे गावातील महिलांचा स्वावलंबी व पर्यावरण पूरक हा आदर्श अनेक बचतगटांनी घेण्यासारखा आहे. पर्यावरणाची हानी व त्याचे दुष्परिणाम आपण सर्वजण भोगीत असून लहानशा विचाराने का होईना आपण सुरूवात कुठेतरी करावी या उद्देशाने आम्ही करांजे गावातील महिलांना कापडी वस्तू बनविण्यासाठी प्रोत्साहित केले. महिलांनी आज या कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे मत सेवावर्धिनी संस्थेच्या व्यवस्थापिका सर्विता वेगस यांनी व्यक्त केले.