घरपालघरमहापालिकेच्या नाळे तलावातून मत्स्यचोरी

महापालिकेच्या नाळे तलावातून मत्स्यचोरी

Subscribe

यात डोंगरी मोडी तलाव, भोलाव तलाव, इंद्राणी वराळे तलाव, नाळे मोठा तलाव यासोबतच कोरलमान, कोरला, तळपा, खुटलई या तलावांचा समावेश होता. १ जून २०२१ ते ३१ मे २०२४ या तीन वर्षांच्या कालावधी करीता हे तलाव मत्स्यसंवर्धनासाठी देण्यात येणार होते.

वसई : वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ई अंतर्गत येणार्‍या ‘नाळे तलावातून मोठ्या प्रमाणात मत्स्यचोरी होत असल्याच्या तक्रारी असून, या चोरांवर महापालिकेने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांची आहे.
वसई-विरार महापालिकेच्या नऊही प्रभागांत एकूण १०४ तलाव आहेत. यापैकी ५९ तलाव मत्स्यसंवर्धन आणि जतन यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार होते. वसई-विरार महापालिका क्षेत्रातील मासेमारी संघटना आणि मच्छीमार संस्था यांना रोजगार उपलब्ध व्हावा, हा उद्देश या मागे होता. त्यानुसार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ई कार्यक्षेत्रातील आठ तलाव मत्स्यसंवर्धनाकरीता ठेका पद्धतीने देण्यात येणार होते. यात डोंगरी मोडी तलाव, भोलाव तलाव, इंद्राणी वराळे तलाव, नाळे मोठा तलाव यासोबतच कोरलमान, कोरला, तळपा, खुटलई या तलावांचा समावेश होता. १ जून २०२१ ते ३१ मे २०२४ या तीन वर्षांच्या कालावधी करीता हे तलाव मत्स्यसंवर्धनासाठी देण्यात येणार होते.

या तलावांकरीता महापालिकेने २० मे २०२१ रोजी सूचना प्रसिद्ध करून निविदा मागवली होती. परंतु दिलेल्या मुदतीत एकाही ठेकेदाराने या निविदेला प्रतिसाद न दिल्याने फेरनिविदा काढली होती. वसई-विरार महापालिकेच्या ई पश्चिम कार्यक्षेत्रातील मालई तलाव, कालुंजा तलाव, गास मोठा तलाव व शिरमोळ या तलावांतील मत्स्यसंवर्धनाकरताही ई-निविदा मागवल्या होत्या. विशेष म्हणजे महापालिकेने या तलावांकरता तीनदा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळालेला नव्हता. त्यानंतर सातत्याने पुन्हा पुन्हा निविदा काढण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवलेली आहे.
सध्या या तलावांतून असलेले मासे चोरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. नाळे तलावात दिवसाढवळ्या अशाप्रकारच्या चोर्‍या होत असल्याच्या परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. फिरोज नामक व्यक्ती हे मासे चोरून विकत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यात महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याप्रकरणी तक्रारी केल्या असतानाही महापालिका लक्ष देत नसल्याची खंत रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे. या चोरांना महापालिका अधिकार्‍यांचाच अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची शंका रहिवाशांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे याविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांची आहे.

- Advertisement -

तलावातून मासेचोरी होत असल्याची कल्पना नाही. अधिक माहिती घेऊन त्यात तथ्य असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल. तलावाच्या सुशोभिकरणाचा ठराव झाला आहे.
-नीता कोरे,
प्रभारी सहाय्यक आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -