सायरस मिस्त्री अपघात स्थळी महामार्ग प्राधिकरणाकडून रुंदीकरण सुरू

महामार्गाशेजारी जेसीबीद्वारे मात्र एक फूट रस्ता खणून डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, महामार्गाचे रुंदीकरण झाल्यावर अपघाताची शक्यता अजूनच वाढणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात येत आहे.

डहाणू : मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. अपघाताआधी घटनास्थळी साधे सूचना फलक सुध्दा पाहायला मिळत नव्हते. अपघातानंतर मात्र, या ठिकाणी सूचना फलकांची जणू यात्राच भरली आहे की काय, असे वाटते आहे. सूचना फलक, दिशादर्शक फलक, डिव्हाईडर आणि रंगरंगोटी झाल्यानंतर आता महामार्ग प्राधिकरणाकडून प्रवासी वाहनांसाठी महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ह्या सर्व्हिस रस्त्याचा आराखडा चुकीचा असल्याचे बोलले जात आहे.  चारोटीकडून मुंबईच्या दिशेने जात असताना सूर्या नदीच्या पुलाच्या आधी हिमाचल पंजाब हॉटेल जवळ महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे सुरू आहे. महामार्गाशेजारी जेसीबीद्वारे मात्र एक फूट रस्ता खणून डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, महामार्गाचे रुंदीकरण झाल्यावर अपघाताची शक्यता अजूनच वाढणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात येत आहे.
मुळात चारोटीकडून येणारा रस्ता सूर्या नदी पुलाच्या जवळपास 300 मिटर आधी तीन वाहिनींवरून दोन वाहिनी होतो तर एक वाहिनीसाठी दुसरा स्वतंत्र पूल आहे. ह्या दोन रस्त्यांमध्ये मोठा गॅप असून, त्यासाठी दोनही रस्त्यांना वेगळे करण्यासाठी पुलाच्या 300 मिटर आधी सुरक्षा रक्षक कठडा बनवण्यात आला आहे आणि आता रुंदीकरण सुरू असलेल्या भागातून प्रवास करणारी वाहने सरळ जाऊन सुरक्षा रक्षक कठड्याला धडकून अपघातग्रस्त होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना महामार्गाच्या ह्या रुंदीकरणाचा फायदा होणार की तोटा ह्याची चर्चा सध्या जाणकारांमध्ये सुरू आहे.  सायरस मिस्त्री अपघात स्थळावरून अवघ्या 500 मिटर आधी महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे सुरू आहे. मात्र, ह्या रुंदीकरणाचा आराखडा चुकीच्या पद्धतीचा असल्याचे बोलले जात आहे. महामार्गाच्या रुंदी करणामुळे अपघात कमी होण्यापेक्षा अपघात वाढण्याची शक्यता वाढत असल्याची चर्चा सुरू आहे.
मिस्त्री यांच्या अपघातानंतर अपघातस्थळ परिसरात रंगरंगोटी आणि अजून बरीच कामे झालेली पाहायला मिळत आहेत. त्यातच आता या ठिकाणी दोनही पुलांचा वापर वाहनचालकांना करता यावा ह्यासाठी महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे सुरू आहे. मात्र, रुंदीकरण करताना केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरून भरधाव येणाऱ्या वाहनांचा दोनही पुलांच्या मध्ये असलेल्या सुरक्षा रक्षक कठड्याला धडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर महामार्गाचे रुंदीकरण करायचेच असेल तर ते चारोटी उड्डाण पुलापर्यंत केल्यास ह्याचा फायदा वाहनचालकांना नक्कीच होणार आहे.
– हरबंस सिंह नन्नाडे, प्रवक्ते, ऑल इंडिया वाहन-चालक मालक संघटना