ठेकेदार बनत आहेत वसुली भाई ?

रोज २० रूपये बाजारकर निश्चित करून त्याप्रमाणे पावती दिली जाते.मात्र ठेकेदाराच्या वसुली करणार्‍या माणसांकडून २० रुपयांऐवजी बेकायदेशीरपणे ३० रुपयांची वसुली केली जात असल्याची तक्रार फेरीवाल्यांनी केली आहे.

बोईसर : बोईसरजवळील सालवड ग्रामपंचायतीच्या बाजार कर वसुली ठेकेदाराकडून टपरीचालक आणि फेरीवाल्यांची मोठ्या प्रमाणात लूटमार होत असल्याची ओरड होत आहे.ठेकेदाराकडून रोज २० रुपयांची पावती देऊन ३० रुपयांची जबरदस्तीने वसुली केली जात असल्याचा आरोप टपरीचालक आणि फेरीवाल्यांनी केला आहे. सालवड ग्रामपंचायत हद्दीत तारापूर औद्योगिक वसाहतीचा भाग समाविष्ट आहे.त्याचबरोबर चित्रालय आणि शिवाजी नगरसारख्या मोठ्या बाजारपेठा देखील असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकाने,टपर्‍या आणि फेरीवाले आहेत. सालवड ग्रामपंचायतीकडून सन २०२२-२३ या वर्षाकरीता एका ठेकेदाराला लिलाव प्रक्रियेद्वारे दुकाने,टपरी, आणि फेरीवाल्यांकडून दैनंदिन बाजारकर वसुलीचा साडे आठ लाख रूपयांचा वार्षिक ठेका देण्यात आला आहे.सालवड ग्रामपंचायतीकडून प्रती दुकानदार,टपरीचालक आणि फेरीवाल्यांकडून रोज २० रूपये बाजारकर निश्चित करून त्याप्रमाणे पावती दिली जाते.मात्र ठेकेदाराच्या वसुली करणार्‍या माणसांकडून २० रुपयांऐवजी बेकायदेशीरपणे ३० रुपयांची वसुली केली जात असल्याची तक्रार फेरीवाल्यांनी केली आहे.

याबाबत फेरीवाल्यांनी वसुली करणार्‍या माणसांना जाब विचारला असता तुमची दुकाने आणि टपर्‍या मोठ्या असल्याकारणाने ३० रुपये घेत असल्याचे सांगितले.मात्र ३० रुपयांची वसुली केल्यावर ३० रुपयांचीच पावती देण्याची मागणी केल्यावर ठेकेदारकडून मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप चित्रालय परिसरातील फेरीवाल्यांनी केला आहे.  बोईसर आणि परिसरातील ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांवर हजारो फेरीवाले व्यवसाय करित असून शुक्रवारी आठवडा बाजाराच्या दिवशी यामध्ये दुपट्टीने वाढ होते.या फेरीवाल्यांकडून कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीमार्फत दरवर्षी लिलावाद्वारे बाजार कर ठेका दिला जातो.मात्र वार्षिक ठेका देताना लिलाव प्रक्रियेमध्ये फेरीवाल्यांची संख्या मुद्दामहून कमी दाखवून वार्षिक बाजार कर वसुली ठेका दिला जाऊन ठेकेदारांचे हित जोपासले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या प्रती फेरीवाला बाजार करापेक्षा अधिकची रक्कम घेतली जात असल्याचे आढळल्यास ठेकेदारावर नियमानुसार कारवाई केली जाईल.तसेच ग्रामपंचायत हद्दीत निश्चित केलेल्या बाजार कर दराचे फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
– चंद्रशेखर जगताप,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)
जि. प.पालघर