घरपालघरमराठी भाषिकांना घर नाकारले; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

मराठी भाषिकांना घर नाकारले; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

मीरा भाईंदर शहरात मराठी भाषिकांना घर नाकारले जात असल्याचे अनेक प्रकार घडत असून मराठी एकीकरण समितीने पुढाकार घेऊन थेट पोलीस ठाण्यात तक्रार करून पहिला दणका दिला आहे.

मराठी भाषिक असल्याने घर नाकारण्याऱ्या दोन जणांविरोधात नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा भाईंदर शहरात मराठी भाषिकांना घर नाकारले जात असल्याचे अनेक प्रकार घडत असून मराठी एकीकरण समितीने पुढाकार घेऊन थेट पोलीस ठाण्यात तक्रार करून पहिला दणका दिला आहे. मीरा रोड येथील शांतीनगर सेक्टर ७ मध्ये राहणाऱ्या रिंकून संगोई देढिया यांनी त्यांचा फ्लॅट विकण्यासंबंधीची एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. धक्कादायक बाब म्हणजे त्यात फ्लॅट फक्त गुजराती, मारवाडी आणि जैन समाजातील व्यक्तींनाच विक्री केला जाईल, असे नमूद केले होते. त्यावरून मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी फेसबुकवर दिलेल्या मोबाईल नंबरवरून संपर्क साधला. त्यावेळी देढिया यांनी मराठी कुटुंबाला जागा विकण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.

आमच्या सोसायटीचा गुजराती, मारवाडी, जैन लोकांनाच फ्लॅट विकावा, असा कायदा असल्याचे देढीया यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे गोवर्धन देशमुख यांनी नयानगर पोलीस ठाण्यात भाषिक मुद्द्यावर घर खरेदीसाठी मज्जाव केल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावरून पोलिसांनी रिंकू संगोई देढिया आणि राहुल देढिया या दोघांवर भारतीय दंड संहिता १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, मीरा भाईंदर शहरात अनेकदा मराठी भाषिकांना फ्लॅट नाकारण्याचे प्रकार या आधीही घडलेले आहेत. विशेषतः अनेक बिल्डरांकडूनही असे प्रकार केले जात असल्याचे स्थानिक सांगतात. पण, कुणी तक्रार करत नसल्याने ही बाब उजेडात येत नाही. देशमुख यांनी हा प्रकार उजेडात आणून थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्याने अशा प्रकारांना आळा बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते.

हेही वाचा –

एकीकडे ‘महाराष्ट्र बंद’ तर दुसरीकडे ठाण्यात बेवारस बॅगेमुळे खळबळ, काय आहे प्रकरण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -