मिरा भाईंदरला मिळणार हक्काचे पाणी

मुंबई महानगरपालिकेतर्फे मिरारोड येथील म्हाडा घरकुल प्रकल्पाकरिता मिरा भाईंदर महानगरपालिकेला २२ जानेवारी, २०१४ रोजी प्रतिदिन १.५ द.ल.ली. पाणीपुरवठा मंजूर केला होता, परंतु अद्याप मंजूर पाणी मिरा-भाईंदर महापालिकेला मिळत नव्हते.

मुंबई महानगरपालिकेतर्फे मिरारोड येथील म्हाडा घरकुल प्रकल्पाकरिता मिरा भाईंदर महानगरपालिकेला २२ जानेवारी, २०१४ रोजी प्रतिदिन १.५ द.ल.ली. पाणीपुरवठा मंजूर केला होता, परंतु अद्याप मंजूर पाणी मिरा-भाईंदर महापालिकेला मिळत नव्हते. याबाबतीत पाणी घेण्याकरिता मुंबई महापालिकेला रितसर सुरक्षा अनामत रक्कम आणि क्रॉस कनेक्शन शुल्क भरणा करून सहाय्यक अभियंता आर व उत्तर विभाग, बोरिवली यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर चेकनाका येथे क्रॉस कनेक्शन पूर्ण करून कार्यक्षेत्रावर जलमापक देखील बसविण्यात आले होते. जोडणीकरिता लागणारे जलमापक, बटरफ्लाय व्हॉल्व व इतर आवश्यक साहित्य तसेच यासाठी लागणारे शुल्क ४ लाख ३४० रुपये भरूनसुद्धा मिरा भाईंदर महापालिकेने मुंबई महापालिकेला अदा केले होते.

जलजोडणीकरिता आवश्यक ती सर्व कार्यवाही मिरा भाईंदर महापालिकेतर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे. तसेच मुंबई महापालिकेची थकीत वसुलीची रक्कमही मिरा भाईंदर महापालिकेने वसूल करून दिली होती. या क्रॉस कनेक्शनच्या जलमापक जोडणीसाठी मिरा भाईंदर महापालिकेमार्फत ४५० मिमी व्यासाचा फ्लो मीटर बसविण्यात आला होता. सर्व सोपस्कार पूर्ण करूनसुद्धा सहाय्यक अभियंता, (जलकामे) आर व उत्तर विभाग, बोरिवली (प), यांच्यामार्फत आक्षेप घेण्यात आला.

यावर मिरा भाईंदर महापालिकेतर्फे योग्य तो खुलासा करून जोडणीकरिता आवश्यक असणारी सर्व कामे पूर्ण केली. तसेच मुंबई महापालिकेची मिरा भाईंदर क्षेत्रातील थकीत वसुली निरंक करून देण्यात आली होती. याबाबतीत मिरा भाईंदर महापालिकेकडून वारंवार पत्रव्यवहार करून देखील आजपर्यंत मुंबई महापालिकेकडून मिरा भाईंदर शहरासाठी मंजूर करण्यात आलेला प्रतिदिन १.५ द.ल.ली. पाणीपुरवठा सुरू करण्यात आला नव्हता. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागील कित्येक महिन्यांपासून पाठपुरावा करत होत्या.

याबाबत बुधवारी मंत्री जयंत पाटील त्यांच्या मंत्रालयातील दालनात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेले १.५ द.ल.ली. पाणी मिरा भाईंदर शहरात तात्काळ सुरू करण्याचे आदेश देण्याबाबतची विनंती आमदार गीता जैन यांनी मंत्री जयंत पाटलांना केली. त्यावर मुंबई महानगरपालिकेने मंजूर केलेले १.५ द.ल.ली. पाणी सध्या प्रायोगिक तत्वावर मिरा भाईंदर महानगरपालिकेला देण्यात यावे, असे आदेश मंत्री यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना दिले. या कामाचा आढावा घेण्यासाठी येत्या सात दिवसात पुन्हा बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी आमदार गीता जैन यांना दिले. या बैठकीला नगरविकास सचिव भूषण गगराणी, मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, नगरविकास उपसचिव नवनाथ वाठ, सुरेश वाकोडे आणि मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.