पार्किंग सुविधा ,रिक्षांबाबत महापालिका थंड, दुचाकीस्वारांकडून बेकायदा वसूल केला जातो दंड

टोईंग ठेकेदाराच्या कमाईसाठीच वाहतूक पोलीस ही कारवाई करत असून बेकायदा रिक्षाचालकांना मात्र मोकळे रान सोडले असल्याची तक्रार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी करून वाहतूक पोलिसांच्या कारवाईला विरोध केला आहे.

वसईः वसई- विरार महापालिका हद्दीत एकही नो पार्किंग झोन नाही. पार्किंग झोनही नाहीत. असे असताना वाहतूक पोलीस दुचाकी स्वारांकडून नो पार्किंगच्या नावाखाली सातशे दंड वसूल करत आहेत. टोईंग ठेकेदाराच्या कमाईसाठीच वाहतूक पोलीस ही कारवाई करत असून बेकायदा रिक्षाचालकांना मात्र मोकळे रान सोडले असल्याची तक्रार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी करून वाहतूक पोलिसांच्या कारवाईला विरोध केला आहे.वसई -विरार महापालिकेच्या पंचवीस लाख लोकसंख्येसाठी परिवहन विभागाकडे केवळ ६५ बसेस आहेत. आरटीओ आणि परिवहन विभागाच्या उदासिनतेमुळे रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत आहेत. तसेच बेकायदा रिक्षांचाही सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या वैयक्तिक कामासाठी आपल्या खासगी वाहनाने घेऊन घराबाहेर पडावे लागते. मात्र याठिकाणीही नियोजनाशिवायची महापालिकेच्या आशीर्वादामुळे पार्किंगची व्यवस्था नाही, नो पार्किंग झोन नाही, त्यामुळे वाहनचालकांना जागा मिळेल तेथे आपले वाहन उभे करावे लागत आहे. या पार्क केलेल्या वाहनांपैकी वाहतूक विभाग केवळ दुचाकी वाहनवर कारवाई करून सातशे रुपये दंड वसूल करत आहे, अशी तक्रार बारोट यांनी केली आहे.

महापालिकेची कमकुवत वाहतूक सेवा, रिक्षाचालकांची मनमानी, पार्किंग, नो पार्किंग झोन नाही, नागरिकांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांवरील बेकायदा गॅरेजचे आणि अवैध फेरिवाल्यांचे अतिक्रमण, मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे उभी केलेली वाहने. सर्वच शहरांच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्‍या उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूला राँग साइडला रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. या परिसरात अनेक बेकायदा रिक्षा स्टँड असल्याने रिक्षाचालक रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभी करतात. असंख्य अवैध पाण्याचे टँकर, बेकायदेशीर रिक्षा तसेच अनेक कालबाह्य वाहने या परिसरात धावत आहेत.या कारणांमुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे, परंतु वाहतुकीच्या समस्या निर्माण करणार्‍या या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ दुचाकी वाहनांवर कारवाई करून सातशे रुपये दंड वसूल केला जात आहे. ही कारवाई नागरिकांना वाहतुकीच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी केली जात नसून टोईंग एजन्सी चालवणार्‍या ठेकेदाराचे दुकान चालवण्यासाठी केली जात असल्याचा आरोप बारोट यांनी केला आहे.

न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला जाईल

दुचाकी वाहन चालकांना दंडित करून ठेकेदाराचे दुकान चालवणारी कारवाई तात्काळ थांबवावी व नागरिकांना होणार्‍या वाहतूक समस्येपासून मुक्ती मिळण्यासाठी सर्वप्रथम महापालिका प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था करावी. नो पार्किंग झोन घोषित करण्यात यावे. तसेच परिसरातील सर्व रस्त्यांवरील अवैध अतिक्रमणे हटवून त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचप्रमाणे आधी बेकायदेशीरपणे धावणार्‍या अवैध वाहनांवर कारवाई करा. यानंतर कोणत्याही नागरिकाने नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभे केल्यास त्याच्यावर कारवाई अवश्य करा, अशी मागणी बारोट यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व गरज भासल्यास न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला जाईल, असाही इशारा बारोट यांनी दिला आहे.