नारंगी उड्डाणपुलाचे काम हवेतच

पण, हा उड्डाणपूल बीओडी तत्वावर बांधण्याचा निर्णय घेतल्याने ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवल्याने अनेक वर्षे काम रखडून पडले होते.

वसई : विरार शहराला पूर्व-पश्चिमेला जोडणार्‍या नारंगी उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडून पडल्याने अवजड वाहनांना वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना साकडे घालण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले. विरार पूर्व-पश्चिमेला जोडणारा एकमेव जुन्या रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. तोही अनेक वर्षे रखडून पडल्यानंतर पूर्ण झाला. पण, सदरचा उड्डाणपूल हा फक्त हलक्या वाहनांसाठीच असल्याने नारंगी रेल्वे फाटकाजवळ अवजड वाहनांसाठीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, हा उड्डाणपूल बीओडी तत्वावर बांधण्याचा निर्णय घेतल्याने ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवल्याने अनेक वर्षे काम रखडून पडले होते.

याविषयावर भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रवी पुरोहित, गुरजित अरोरा, कपिल म्हात्रे, आशिष जोशी, पंकज नंदवाना यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घेऊन लेखी निवेदन देऊन सदर उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी विनंती केली. मंत्री चव्हाण यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून त्वरित संबंधित अधिकार्‍यांची बैठक लावण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या कामास गती मिळून काम लवकर पूर्ण होऊन वाहनचालक व नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

पाचशे मीटर अंतर कापण्यासाठी अर्धा ते एक तास
टोलवसुलीतून खर्च निघणे अवघड असल्यानेच ठेकेदारांनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे केंद्र सरकारच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर योजनेअंतर्गत, केंद्र सरकार व सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून सदर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. पण, तेही काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडून पडले आहे. आजमितीस अस्तिस्त्वात असलेला विरार पूर्व -पश्चिम जोडणारा रेल्वे उड्डाणपूल हा केवळ हलक्या वाहनासाठी उपलब्ध असून या एकमेव उड्डाणपुलावर कायम वाहतूक कोंडी होऊन केवळ पाचशे मीटर अंतर कापण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तास वेळ जातो. नारिंगी फाटक उड्डाणपूल पूर्ण न झाल्याने नारंगी रेल्वे फाटकात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून वाहनचालक, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.