घरपालघरनववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज पालघर जिल्हा

नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज पालघर जिल्हा

Subscribe

वाडा, विक्रमकड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यात लहान-मोठे रिसॉर्टस आणि फार्महाऊसेस आहेत. ती शुक्रवारपासून ते रविवारी रात्रीपर्यंत बुक झाली आहेत.

पालघर: दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तालुक्यात थर्टीफस्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटक शुक्रवारपासूनच दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा चारही तालुक्यातील रिसॉर्ट आणि फार्महाऊसेस फुल्ल झाले आहेत. डिसेंबर महिन्यात या भागातील वातावरण अतिशय थंड असते. तसेच जव्हारला मिनी महाबळेश्वर असेही म्हटले जाते. हा परिसराला हिरव्यागार डोंगर-दर्‍या, झाडी असा शुध्द हवा आणि स्वच्छ वातावरण असा मनमोहक निसर्ग लाभला आहे. तसेच हा परिसर जवळच असल्याने मुंबई, ठाणेसह उपनगरातील पर्यटक थर्टीफस्टसाठी वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडाला पसंती देत असतात. कोरोनामुळे दोन वर्षे त्यात खंड पडला होता. पण, यंदा राज्य सरकारने सर्वच निर्बंध दूर केल्याने पर्यटकांचे पाय पुन्हा एकदा विक्रमगड वळले आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच विविध फार्महाऊसमध्ये पर्यटक येताना दिसू लागले.

वाडा, विक्रमकड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यात लहान-मोठे रिसॉर्टस आणि फार्महाऊसेस आहेत. ती शुक्रवारपासून ते रविवारी रात्रीपर्यंत बुक झाली आहेत. याठिकाणी पर्यटकांसाठी व्हेज-नॉज व्हेज जेवणासाठी मद्याचाही आस्वाद घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसही सतर्क झाले आहेत. शुक्रवारपासूनच चारही तालुक्यात नाकाबंदी आणि गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना रिसॉर्ट आणि फार्महाऊस मालकांना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

केळवे बीच तयार
31 डिसेंबरचे सेलिब्रेशन आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पालघर जिल्ह्यातील केळवे बीचला पर्यटकांची पसंती मिळत असून मुंबई, ठाणे, पुणे इत्यादी भागातून शेकडो पर्यटक नव्या वर्षाच्या स्वागतासह गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी शनिवार आणि रविवार येथे मोठी गर्दी करणार आहेत. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केळवा सागरी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. पश्चिम रेल्वेच्या केळवा रोड स्थानकाच्या पश्चिम किनारपट्टीभागातील निसर्गरम्य आणि स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या केळवे बीचला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. आज शनिवार 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस असून दुसर्‍या दिवशी रविवार असल्याने सरत्या वर्षाला गुड बाय व नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांना जणू मोठी पर्वणीच मिळाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यासह विविध भागातून पर्यटक प्रचंड संख्येने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीच परिसरात छोटे-मोठे असे शंभर ते दीडशे रिसॉर्ट असून विविध प्रकारचे व्हेज, नॉनव्हेज पदार्थांनी पर्यटकांना मंत्रमुग्ध करण्यास ते सज्ज झाले आहेत. शनिवार, रविवार व्यतिरिक्त विविध सुट्टीच्या दिवसात आपल्या कुटुंबासह येणारे पर्यटक वाढले असून निसर्गरम्य परिसराचा आणि समुद्रात पोहण्याचा सर्वच मनमुरादपणे आनंद घेताना दिसत आहेत. तर वाढत्या पर्यटकांमुळे येथील हॉटेल, रिसॉर्ट व्यवसायासोबतच गोरगरीब जनतेला विविध चवदार पदार्थ व अन्य वस्तूंची विक्री करून रोजगार उपलब्ध होत आहे. 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी शनिवार व रविवारी असे दोन दिवस येथील समुद्रकिनारा पर्यटकांनी फुलून जाणार आहे. या दृष्टीने बीच परिसरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विजेची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

विविध भागातून येणार्‍या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांकडून वाहतूक कोंडी होवू नये, मद्यधुंद पर्यटकांकडून रात्रीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनास बीचवर लाईफगार्ड नेमण्यासच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सेलिब्रेशन करताना कोणीही बीचवर मद्यपान करून कायदा व सुव्यवस्थेचा भंग करू नये यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
– भीमसेन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, केळवा सागरी पोलीस स्टेशन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -