Eco friendly bappa Competition
घर पालघर पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाईला यश

पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाईला यश

Subscribe

२०२१ व २०२२ या वर्षात करण्यात आलेल्या कारवाईमधील फरक पाहता चालू वर्षात अमली पदार्थ विक्री व सेवन करणार्‍यांवर करण्यात येणार्‍या कारवाईच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

भाईंदर :  मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमलीपदार्थांची विक्री होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी केल्या आहेत. याकरिता काही दिवसांपूर्वीच मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यात अन्न व औषध प्रशासन, सीमाशुल्क विभाग, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य विभाग यांची बैठक पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. मीरा-भाईंदर व वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दित सर्व पोलीस स्टेशन त्याचबरोबर इतर विभागांमार्फत आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थचे सेवन करणार्‍या आणि त्यांची विक्री करणार्‍यांवर पोलीस मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत. यात मिरारोड, काशिमिरा, उत्तन, नवघर, भाईंदर, नयानगर, वसई, माणिकपूर, विरार, वालीव, तुळींज, आचोले, पेल्हार, अर्नाळा, मांडवी, नालासोपारा अमली पदार्थ विरोधी कक्ष,गुन्हे शाखा यांच्यामार्फत सन २०२१ या पूर्ण वर्षात अमली पदार्थ विक्री करणार्‍या १०५ जणांवर तर त्याचे सेवन करणार्‍या ४०८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत अमली पदार्थ विक्री करणार्‍या ११७ तर त्याचे सेवन करणार्‍या ५४८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. २०२१ व २०२२ या वर्षात करण्यात आलेल्या कारवाईमधील फरक पाहता चालू वर्षात अमली पदार्थ विक्री व सेवन करणार्‍यांवर करण्यात येणार्‍या कारवाईच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थ विक्री करणार्‍यावर कारवाई केली जात आहे. तरीही काही ठिकाणी याचे सेवन व विक्रीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांच्या विक्री व सेवन रोखण्यासाठी पोलीस विभागाला सतर्क राहण्यासाठी व नियमित कारवाई करण्यासाठी सतत बैठका घेण्यात येतात. बंद पडलेल्या गोडाऊन, कारखाने आदी ठिकाणी पथकांनी नियमित तपासणी करावी. तसेच शेजारील राज्यातून अंमली पदार्थ आपल्या शहरात येणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही यावेळी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -