घरपालघरपाणी टंचाईग्रस्त भागात गळके टँकर

पाणी टंचाईग्रस्त भागात गळके टँकर

Subscribe

त्यातही बर्‍याचशा टँकरच्या टाक्या लोखंडी पत्र्याच्या असून गंजलेल्या अवस्थेत आहेत.

मोखाडा – तालुक्यातील जवळपास ७० गाव पाड्यांना फेब्रुवारी महिन्यापासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून २० टँकर्सद्वारे या गाव पाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.त्यातही दिवसागणिक नवीन गाव पाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करावा यासाठी प्रस्ताव येऊन पडत आहेत.मात्र ज्या गाव पाड्यांना टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात आहे, अशा बर्‍याचशा टँकरना गळती लागली असून गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गाव पाडे पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींपासून २० ते २५ किलोमीटर अंतरावर विखुरलेले असून टंचाईग्रस्त गाव पाड्यातील विहिरींपर्यंत पाणीपुरवठा करताना टँकर चालकांना मात्र मोठी कसरत करावी लागत आहे.त्यातही बर्‍याचशा टँकरच्या टाक्या लोखंडी पत्र्याच्या असून गंजलेल्या अवस्थेत आहेत.

त्यामुळे या टँकरमध्ये पाणी भरल्यानंतर टाकी गंजलेल्या ठिकाणी पाण्याला गळती सुरु होते.मुळात गाव पाड्यातील नागरिकांना चांगले पाणी मिळावे यासाठी पळसपाडा गावाजवळील धरणाच्या पायथ्याशी विहीर तयार करण्यात आली असून याच विहिरीतून हे पाणी तालुक्यातील अनेक टंचाईग्रस्त गाव पाड्यातील नागरिकांसाठी टँकर द्वारे पोहच केले जाते.पाण्याचे टँकर भरण्याची विहीर ते गाव पाडे असे १५ ते २० किलोमीटरचे अंतर आहे. तर कुठे २० ते २५ किलोमीटर अंतर आहे.त्यामुळे पाणी भरण्याची विहीर ते टंचाईग्रस्त गाव पाड्यातील विहीर हे अंतर जास्त असल्याने त्या गाव पाड्यातील विहिरीपर्यंत जाता जाता टँकरमधील हजारो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात आहे.

- Advertisement -

 

टँकर सुस्थितीची खातरजमा होते का?

- Advertisement -

शासन वर्षाकाठी टंचाईग्रस्त गाव पाड्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर सारख्या वाहनांवर लाखो रुपयांचा खर्च करत असते. परंतु गाव पाड्यांना पाणीपुरवठा करणारे टँकर सुस्थितीत आहेत किंवा नाही याची खातरजमा का ? केली जात नाही की केवळ टँकर लॉबीला पोसण्याचे काम तर पाणीपुरवठा विभाग करत नाहीना ? असा प्रश्न यानिमित्ताने नक्की उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -