माणुसकीच्या पंथाने दिला आलीयाला आधार

तिच्या ह्या कामाची दाखल घेत वसईच्या तहसीलदार यांनी या तृतीयपंथी आलीया पवार हिला तसीलदार कार्यलयात सेतूमध्ये काम देऊन तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरु केले आहे.

वसई: जगभरात कोरोना ह्या घातक विषाणूने थैमान घातल्यानंतर लाखो लोकांची आर्थिक स्थिती डबघाईला आली होती. कोरोनामुळे अनेक पालकांची नोकरी गेली किंवा व्यवसायामध्ये अडचणी आल्यामुळे फी भरण्यात बाधा येत होती .फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे वसई पूर्वेकडील खान कंपाऊंड अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाले होते. त्यावेळी ह्या मुलांना शिकविण्यासाठी पुढे आली ती तृतीयपंथी आलिया पवार .तिच्या ह्या कामाची दाखल घेत वसईच्या तहसीलदार यांनी या तृतीयपंथी आलीया पवार हिला तसीलदार कार्यलयात सेतूमध्ये काम देऊन तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरु केले आहे.
कोरोनामुळे शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण सुरू हा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने सुरू केला होता.मात्र अँड्रॉईड मोबाईलशिवाय ऑनलाईन शिक्षण अशक्य असून हातावर पोट असणार्‍यांकडे दूरचित्रवाणीसारखी माध्यमेही नसल्याने वसई पूर्वेकडील खान कंपाऊंड येथे अनेक मुले ऑनलाईन शिक्षणापासून दूरच होत असल्याने आलिया मिलिंद पवार या किन्नरकडून या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येते होते. बीएससी मायक्रोबायोलॉजी उत्तीर्ण झालेल्या आलिया मिलिंद पवार ही आपल्या शिक्षणाचा उपयोग करून या शिक्षणापासून वंचित असलेल्या या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत होती . रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अर्बन महाविद्यालयात आपले बीएससी मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आपल्याला योग्य नोकरी मिळेल, अशी आशा मनाशी बाळगून कित्येक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर देखील त्यांच्या पदरी निराशाच पडली. डोक्यावर एका आईची जबाबदारी असल्याने भीक मागून आणि लोकांना आशीर्वाद देऊन ती आपला उदरनिर्वाह करते. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोना काळानंतर तिच्या परिसरातील तब्बल 50 ते 60 मुले शिक्षणापासून वंचित होत चालली असल्याने आपल्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षांपासून मोफत शिक्षण देत आहे. शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी तिने त्यांच्यासोबत खेळायला सुरुवात केली.दोन ते तीन मुलांपासून सुरुवात केल्यानंतर ती दोन सत्रांत झोपडपट्टीतील सुमारे 30 ते 40 मुलांना मोफत शिकवणी देते होती. तिच्या ह्या कामाची दखल घेत वसईच्या तहसीलदार उजवला भगत यांनी तिला भेटायला बोलावले. तिची सर्व माहिती घेतली आणि त्या तिचे शिक्षण ऐकून अचंबित झाल्या, संजय गांधी निराधार योजनेतून आलियाला पैसे मिळणार आहेत. तसेच तिला तहसीलदार ही एक ठराविक रक्कम देणार आहेत. त्याच बरोबर सेतू मधूनही तिला पैसे मिळणार आहेत.
==============================================
आलिया पवार हिची स्टोरी वाचनात आली होती. ती वाचल्यावर तिचा शोध घेऊन तिला भेटायला बोलावले. तालुक्यात वेगवेगळी कामे करत असतानाच अशा माणसांना आपल्याला काय मदत करता येईल .या अनुषंगाने विचार केला. तृतीय पंथिया बाबत समाजात वेगळी भावना आहे. सेतूमध्ये काम देण्याचा विचार केला आणि ते काम केले. संजय गांधी योजनेतून तिला मदत मिळणार आहे. तसेच तिला रेशन कार्ड दिल्याने तिला धान्य ही आता मिळू लागले आहे.
उजवला भगत , तहसीलदार ,वसई
============================================
मी उच्च शिक्षण घेतल्यावर भीक मागण्यापेक्षा नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले . परंतु त्याला यश आले नव्हते. कोरोनाच्या काळात मी राहत असलेल्या ठिकाणच्या मुलांना शिकवण्याचे काम केले. त्याबाबत वृत्तपत्रांनीही त्याची दाखल घेतली होती. आता तर तहसीलदार मॅडमनी मला काम दिले आहे. आम्ही समाजातीलच एक घटक आहोत. आम्हालाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि आज मी माझ्या पायावर उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे. याचा मला अभिमान आहे.
आलिया मिलिंद पवार (तृतीय पंथी )