घरपालघरवसई-विरारमधील नाले ठरताहेत जीवघेणे

वसई-विरारमधील नाले ठरताहेत जीवघेणे

Subscribe

प्रत्यक्षात असलेल्या नाल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात वसई-विरार महापालिका कमी पडत असल्याने हे नाले जीवघेणे ठरत आहेत.

वसईः नैसर्गिक नाल्यांवर झालेले अतिक्रमण आणि नियोजनाचा अभाव आणि वसई-विरार महापालिका अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा यामुळे वसई-विरारमधील नाले जीवघेणे ठरत आहेत. वसई-विरारमध्ये २०८ नाले आहेत. मध्यंतरी महापालिकेने आणखी २ नवीन नाल्यांचा शोध घेतला होता. या नाल्यांची एकूण लांबी १९८ किमी आहे. यात अनेक ठिकाणी नाल्यांवर भरणी करून नाल्याचे पात्र अरुंद करण्यात आल्याचे समोर आले होते. नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे शहराला पुराचा सामना करावा लागत असल्याने महापालिकेने नवीन नाल्यांची शोध मोहीम हाती घेतल्याची माहिती आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली होती. प्रत्यक्षात असलेल्या नाल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यात वसई-विरार महापालिका कमी पडत असल्याने हे नाले जीवघेणे ठरत आहेत.

विरार -पूर्वेकडील जीवदानी पायथ्यापासून सुरू झालेला व मनवेल पाडा गावातून रेल्वे कल्व्हर्टला मिळणार्‍या नाल्याच्या संरक्षण आणि संवर्धनाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने हा नालाही जीवघेणा झाला आहे. विशेष म्हणजे या नाल्यावर अंदाजे तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून महापालिकेने स्लॅब टाकले आहेत. मात्र नागरिकांपेक्षा याठिकाणी अतिक्रमणे करणार्‍यांनाच महापालिकेच्या या कथित विकासाचा फायदा झाला असल्याने महापालिकेविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेचे स्लॅबचे काम थांबल्याने यातून निघणार्‍या सळ्या बाहेर डोकावत आहेत. असलेल्या स्लॅबवर वाहने पार्क करण्यासाठी अतिक्रमण झालेले आहे. शिवाय स्लॅबमुळे नाल्यांची सफाई होत नसल्याने नाला तुंबला आहे. उर्वरित नाल्यांना संरक्षण कठडा नसल्याने नाल्याला लागूनच छोटा रस्ता असल्याने वाहनचालक थेट या नाल्यात कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.वसई विरार महापालिकेने यंदा ९५ टक्के नालेसफाई करूनही शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामागचे कारण शोधले असता शहरातील नैसर्गिक नाले अतिक्रमणाखाली गेल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

बॉक्स

याकरता शहराच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करून पुढील आखणी करण्यात येणार असल्याचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले होते. ज्या नाल्यांवर अतिक्रमणे आहेत, अशा ठिकाणी तातडीने कारवाई केली जाईल. यासाठी पालिका लवकरच नागरिकांना वृत्तपत्रातून आवाहन करणार असल्याचे सुद्धा महापालिका आयुक्तांनी म्हटले होते. मात्र, आयुक्तांना या सगळ्या आश्वासनांचा विसर पडला आहे.

- Advertisement -

 

गटारेही जीवघेणी

७ नोव्हेंबर रोजी विरार पश्चिमेला एका वयोवृद्ध महिलेचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना नालासोपारा पुर्वेच्या अग्रवाल नगर परिसरातील एका गटारात ऋषभ सरकार (वय २५) याचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -