सुर्या नदी पात्रातील बांधकामाचा प्रश्न विधानसभेत

पालघरच्या तहसीलदारांनी सुर्या नदी पात्रातील दगडी बांधकाम तात्काळ थांबवण्याची नोटिस दिल्यानंतरही पात्रात भिंतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

मनोर: चिल्हार बोईसर रस्त्यावरील लालोंडे ग्रामपंचायत हद्दीत सूर्या नदीवरील पुला लगत नदी पात्रात अतिक्रमण करून अवैधरित्या दगडी भिंत उभारून भराव केल्या प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.सुर्या पात्रात बांधकाम करून नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण केल्याने नदी पात्रा लगतच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त करीत बांधकाम हटवण्याची मागणी तहसीलदारांकडे केली होती.पालघरच्या तहसीलदारांनी सुर्या नदी पात्रातील दगडी बांधकाम तात्काळ थांबवण्याची नोटिस दिल्यानंतरही पात्रात भिंतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

सुर्या नदी पात्रात अतिक्रमण करून दगडी भिंत बांधण्यात आली आहे.चिल्हार बोईसर रस्त्यावरील लालोंढे गावच्या हद्दीत सुर्या नदीपात्रात दगडी कुंपणाचे बांधकाम आणि माती भराव करण्यात आला आहे.भिंत आणि माती भराव करून नदीचे पात्र अरुंद केले जात असताना पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आमदार दौलत दरोडा यांनी तारांकित प्रश्नात नदीपात्रात अतिक्रमण प्रकरणी जागा मालकांना बजावलेल्या नोटिसा, शासनाने केलेली चौकशी,चौकशीत आढळललेले तथ्य, केलेली कारवाई आणि कारवाईसाठी झालेल्या विलंबाच्या कारणांची माहिती विचारण्यात आली आहे. चिल्हार बोईसर रस्त्यावर ललोंढे गावच्या हद्दीत सुर्या नदीवर तीन पूल बांधण्यात आले आहेत.जुन्या पुलाच्या खालच्या बाजूने नदी पात्रात काही मीटर अंतरावर एमआयडीसी राबवत असलेल्या पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधलेला आहे.बंधार्‍याच्या पाणी साठ्यापासून काही फूट अंतरावर बांधकाम सुरू आहे.