एका लाचेची अनोखी गंमत, दारू,पैसे दाखल्याची किंमत

दहा हजार रुपयांसह एका दारुच्या बाटलीची मागणी त्यांनी केली होती. मात्र, पैशाआधीच दारुची बाटली घेताना दोघांना अँटीकरप्शनच्या पथकाने अटक केली.

वाडा ः हाव आणि त्यानंतर येणारी लाचेची मागणी माणसाकडून काय करून घेईल हे सांगता येत नाही.अशीच एक घटना वाडा तालुक्यात घडली आहे. वाडा तालुक्यातील दोन वनपालांना सातशे साठ रुपयांची दारुची बाटली चांगलीच महागात पडली आहे. ना हरकत दाखल्यासाठी दहा हजार रुपयांसह एका दारुच्या बाटलीची मागणी त्यांनी केली होती. मात्र, पैशाआधीच दारुची बाटली घेताना दोघांना अँटीकरप्शनच्या पथकाने अटक केली.

विजय लक्ष्मण धुरी आणि विष्णू पोपट सांगळे अशी वनपालांची नावे आहेत. विजय धुरी नेहरोली परिमंडळात वनपाल आहे. तर विष्णू सांगळे बाणगंगा परिमंडळात वनपाल आहे. एका बिल्डरला जमीन अकृषिक करण्यासाठी ना हरकत दाखला पाहिजे होता. त्यासाठी धुरी आणि सांगळे यांनी बिल्डरच्या मॅनेजरकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. सोबत त्यांनी दारुची एक बाटली मागितली होती. धुरी आणि सांगळे यांनी दारुची बाटली लगेचच देण्याचा आग्रह धरला. याप्रकरणी मॅनेजरने अँटीकरप्शनच्या ठाणे विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून अँटीकरप्शनच्या पथकाने सापळा रचला होता. वनविभागाच्या वाडा येथील कार्यालयात तक्रारदाराकडून दारुची बाटली घेताना दुपारी तीनच्या सुमारास दबा धरून बसलेल्या अँटीकरप्शनच्या पथकाने धुरी आणि सांगळे यांनी ताब्यात घेतले.