पालघरमध्ये हजारो लिटर पाण्याची नासाडी

पाणी पुरवठा विभागाचा हलगर्जीपणा

millions of liter water waste due to pipeline break at kalyan-shil road
प्रातिनिधिक फोटो

पालघर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची जलवाहिनी फुटी व गढूळ पाणी पुरवठा आदींची बातमी ताजे असताना पालघर शहरात पश्चिमेस भगिणी समाज मराठी शाळेच्या मागे असलेल्या पालघर नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचे पाण्याची मोठी टाकी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरही पंप बंद न केल्याने टाकीतुन मोठ्या प्रमाणात पाणी खाली पडून वाहुन जाताना नागरिकांना दिसून आले.

सदर प्रकरणी नागरिकांनी दखल घेत सदर पाणी प्रवाह बंद करण्यासाठी त्वरित नगरपरिषदेच्या मुकादमासह संबंधितांना फोन केला. परंतु कोणीही फोन उचलले नाही. त्यामुळे जवळ जवळ दीड तास होऊन ही वाहणारे पाणी बंद न झाल्याने हजारो लिटर पाणी वाहून वाया गेले. यावेळी संतप्त नागरिकांनी हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नगरपरिषद पाणी पुरवठा विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

पालघर नगरपरिषद व २६ गावे पाणी पुरवठा योजना अंतर्गत २६ गावांमध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. पण, त्यातील काही गावांमध्ये ५ दिवसात फक्त एकदा पाण्याच्या पुरवठा असतो. असे असताना नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे हलगर्जीपणामुळे दुपारच्या एक ते अडीच वाजेच्या सुमारास टाकी भरल्यानंतर पंप बंद न केल्याने टाकीतून पाणी वाहत होते. त्यावेळी पालघर नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचा एकही कर्मचारी टाकी भरल्यानंतर पंप बंद करण्यासाठी उपस्थित नव्हता. हजारो लिटर पाणी वाहून गेल्यानंतर पाणी पुरवठा विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने पाणी बंद केले.

पालघर नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना नेहमी घडत राहतात. ज्यामुळे आजपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.
जयंत गोखले- नागरीक, पालघर

हा नागरिकांच्या पैशांच्या अपव्यय आहे. यासाठी दोषींवर कारवाई झाली पाहिजे.
-अरुण माने- नगरसेवक, पालघर नगरपरिषद

याप्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल.
– स्वाती कुलकर्णी देशपांडे, मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद