घरपालघरहरभरा, कलिंगड पिकांचा चिखल; जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची मागणी

हरभरा, कलिंगड पिकांचा चिखल; जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईची मागणी

Subscribe

गेल्या आठवड्यात दिवस-रात्र कोसळलेल्या अवकाळी पावसाने वाडा तालुक्यातील कलिंगड व हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

गेल्या आठवड्यात दिवस-रात्र कोसळलेल्या अवकाळी पावसाने वाडा तालुक्यातील कलिंगड व हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अलिकडेच लागवड केलेली कलिंगडाची रोपे मरुन जाऊन अक्षरशः त्यांचा चिखल झाला आहे.
वाडा तालुक्यात रब्बी पिकाचे ४ हजार हेक्टर क्षेत्र असून या क्षेत्रातील निम्मे पिक गेल्या बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केले आहे. विशेषतः हरभरा, मूग, वाल या रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. वाडा तालुक्यात अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कलिंगड, खरबूज पिकांची लागवड करतात. यावर्षी काही दिवसांपुर्वीच  तालुक्यातील विविध गावांमध्ये ३० ते ३५ हेक्टर क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड केली आहे. मात्र, गेल्या बुधवारी दिवसरात्र कोसळलेल्या पावसाने कलिंगड, खरबूजाची लागवड केलेल्या शेतांची तळे करुन टाकली.

शेतांमध्ये एक ते दीड फुट उंचीपर्यंत पाणी १२ ते १५ तास भरुन राहिल्याने कलिंगडाची रोपे मरुन गेली आहेत. शेतात रोप दिसत नसून चिखल झालेला दिसून येत आहे. कलिंगड पिकासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. मोठा खर्च वाया गेल्याने कलिंगडाची लागवड केलेले शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहेत. मौजे सांगे येथील प्रगतशील शेतकरी अनिल पाटील यांनी ३ एकर क्षेत्रावर केलेली कलिंगड पिकाची लागवड संपूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. मौजे अंबिस्ते बुद्रुक येथील संजय पाटील या शेतकऱ्याच्या २ एकर क्षेत्रावरील कलिंगड पिक अवकाळी पावसाने जमीनदोस्त केले आहे.

- Advertisement -

कलिंगड पिकासाठी प्रती एकरी ४० ते ४५ हजार रुपये खर्च येत असतो, हा संपूर्ण खर्च वाया गेल्याने शेतकरी अर्थिक संकटात सापडले आहेत. हरभराचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हरभरा पिकांमधील शेतांमध्ये गुडघाभर पाणी भरल्याने हे पीकसुद्धा उद्ध्वस्त झाले आहेत. मूग, वाल या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर रब्बी, भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच विट उत्पादन करणारे व्यावसायिक यांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपदग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत व जास्तीत जास्त या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील बाधीत शेतकऱ्यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हेही वाचा – 

Video: सगळंच संपलय! माझे वडील हिरो होते, ब्रिगेडियर LS Lidder यांच्या मुलीची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -