घरराजकारणमहापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करत नाही; विरोधी पक्षनेते अजित पवारांचा...

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधी माफ करत नाही; विरोधी पक्षनेते अजित पवारांचा विधानसभेत घणाघात

Subscribe

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही. सरकारला याची किंमत मोजावी लागेल," असा इशारा देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला

नागपूर :- “औद्योगिकदृष्ट्या अव्वल महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर चालले आहेत. युवकांचे रोजगार बुडत आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्री, अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं जात आहे. अंधश्रद्धांना खतपाणी घातलं जात आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. उच्चपदस्थ व्यक्ती, मंत्री, लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये सातत्याने केली जात आहेत. यातून कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करत नाही. सरकारला याची किंमत मोजावी लागेल,” असा इशारा देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभेत सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विरोधी पक्षांतर्फे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात त्यांनी महापुरुषांबद्दलची अवमानकारक वक्तव्ये, मंत्री व अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, राज्याबाहेर चाललेले उद्योग, त्यामुळे वाढलेली बेरोजगारी, महिलांवरील वाढते गुन्हे, अंधश्रद्धेला घातलं जाणारं खतपाणी असे अनेक मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला.

- Advertisement -

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी, भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी. भ्रष्टाचार करणारे सत्तारुढ किंवा विरोधी पक्षातील असले तरी त्यांच्यावर कारवाई करावी. महिलांना संरक्षण द्यावे. राज्यात उद्योगपुरक वातावरण निर्माण करुन उद्योगांना राज्याबाहेर जाण्यापासून रोखावे, अशा अनेक मागण्या अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात केल्या. महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही पाठिंबा देऊ, असा विश्वासही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अंतिम आठवडा
प्रस्तावाच्या भाषणातील ठळक मुद्दे
उद्योग
 संपूर्ण देशात महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत आघाडीवर राहिलेले राज्य आहे. राज्यातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, धोरणातील सातत्य, कुशल मनुष्यबळ, यामुळे आपण सातत्याने पहिल्या क्रमांकावर होतो.
 आज महाराष्ट्र वेगळ्या परिस्थितीतून जातो आहे. मोठमोठे उद्योग एकामागून एक राज्याबाहेर जात असताना सत्तेवर असलेले महाराष्ट्राची बाजू घेण्याऐवजी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 वेदांत-फॉक्सकॉन सारखा मोठा उद्योग गुजरातला गेला, ही वस्तुस्थिती आपल्यासमोर आहे. राज्याराज्यांमध्ये स्पर्धा असते, ती यापूर्वीही झालेली आहे. पण सातत्याने काही प्रकल्प, काही उद्योग, काही संस्था महाराष्ट्रातून बाहेर जात असतील तर त्याची चर्चा झाली पाहिजे.
 जनतेला आणि विरोधकांना उद्योग का बाहेर गेला हे सांगण्याऐवजी तुम्ही महाराष्ट्र आणि गुजरातच्या लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
 “महाराष्ट्र येत्या दोन वर्षात गुजरातच्या पुढे नेऊ, गुजरात म्हणजे लहान भाऊ, पाकिस्तान नाही”, अशी सारवासारव उप मुख्यमंत्री महोदयांनी वेदांत-फॉक्सकॉन गुजरातला गेल्यानंतर केली.
 अहो, मोठ्या भावाचा (शिवसेना) हात धरुन लहान भाऊ (भाजपा) कधी “मोठा” झाला, मोठ्या भावाचे घर कसे मोडले, हे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. बहुदा, तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्ही करणार नाही ना?
 गुजरातविषयी कुणाला आकस असण्याचे कारण नाही. गुजरातला पाकिस्तान मानण्याची तर अजिबात गरज नाही आणि कोणताही पक्ष तसे मानत नाही. महाराष्ट्रातील सर्वच पक्ष आणि जनता गुजरात आणि गुजराती जनतेबद्दल प्रेम बाळगुन आहे.
 पण अपयश झाकण्यासाठी तुम्हाला पुन्हा “पाकिस्तान”ला मध्ये आणावे लागले. हाच तर तुमचा खेळ आहे, जो गेल्या 15 वर्षापासून भारतातील जनता पाहते आहे.
 महाविकास आघाडीच्या काळात बाहेर गेलेल्या उद्योगांची यादी जाहीर करू… उद्योग मंत्र्यांचे आव्हान
 फॉक्सकॉन आणि इतर उद्योग राज्याबाहेर गेल्याचे अपयश लपवण्यासाठी “महाविकास आघाडीच्या काळात राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांची यादी जाहीर करु,” असे उद्योग मंत्री यांनी विरोधी पक्षाला आव्हान दिले.
 स्वत: उदय सामंत जी त्या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात होते. त्यावेळी ते का गप्प होते, हा प्रश्न मी माध्यमांमधूनही विचारला होता, आजही तोच प्रश्न मी त्यांना विचारतो आहे.
 फॉक्सकॉनचे अपयश स्वीकारण्याऐवजी असली आव्हाने दिली जात आहेत. पण अशा आव्हानांना आम्ही भीक घालत नाही. तुम्ही राज्याचे उद्योग मंत्री आहात, गुंतवणूक राज्यात आणण्याचे प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत. पण तुम्हीच जर अशाप्रकारे वातावरण तयार करणार असाल तर या महाराष्ट्राला कसा न्याय द्याल ?

- Advertisement -

राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था
 आजच्या प्रस्तावात राज्याची बिघडलेली कायदा व सुव्यवस्था हा विषय आहे.
 चोऱ्या, दरोडे, महिलांवरील अत्याचार, वाढलेली गुन्हेगारी यावर आपण चर्चा करीत असतो. तीही चर्चा आपण करणार आहोत.
 पण कधी नाही एवढे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेपुढे एक वेगळ्या प्रकारचे आव्हान निर्माण झाली आहे. त्यावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे.
 सांविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींकडून मागच्या काळात वंदनीय अशा महापुरुषांचा अपमान केला गेला. राज्याच्या मंत्र्यांकडून अपमान केला गेला. सत्तारुढ पक्षाच्या आमदारांकडून महिलांविषयी खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्यं झाली, दादागिरीची भाषा केली गेली.
 राजकीय कुरघोडीतून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. राजकारणासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दलाचा गैरवापर होत आहे. हे आज कायदा व सुव्यवस्थेपुढील सर्वात मोठे आव्हान आहे.
 ज्यांनी कायदा व सुव्यवस्था राखायची, तेच जर कायदा व सुव्यवस्था बिघडवत असतील, त्यांना पाठीशी घातले जात असेल तर जनतेने दाद कुणाकडे मागायची ?
 समाजात ज्यांनी शांतता राखण्याचे काम करायचे असते… तेच जर अशांतता निर्माण करत असतील तर काय करायचे?
राज्यपाल महोदयांनी महापुरुषांचा अपमान केला.
 या राज्याने नेहमीच राष्ट्रपुरुषांचा सन्मान केला आहे. राष्ट्रपुरुषांबद्दल जाज्वल्य अभिमान बाळगणारे हे राज्य आहे.
 पण राज्याचे सर्वात मोठे सांविधानिक पद भूषवणाऱ्या मान्यवरांकडून याच महाराष्ट्रात झालेला महापुरुषांचा अपमान महाराष्ट्रातील जनतेला पटलेला नाही, प्रचंड असंतोष आज राज्यात आहे.


हेही वाचाः समृद्धी महामार्गानंतर अजून एक प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -