घरराजकारण16 वर्षांनी मनसेला मिळू शकते शिंदे मंत्रिमंडळात स्थान!

16 वर्षांनी मनसेला मिळू शकते शिंदे मंत्रिमंडळात स्थान!

Subscribe

महाविकास आघाडी सरकारला धक्का देऊन शिंदे सरकार सत्तेवर आले. पण आता सर्वांचे लक्ष आहे ते, मंत्रीपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार? अलीकडेच हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या मनसेलाही त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारला धक्का देऊन शिंदे सरकार सत्तेवर आले. पण आता सर्वांचे लक्ष आहे ते, मंत्रीपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार? भाजपा आणि शिंदे गटात असलेल्यांपेक्षाही छोटे पक्ष तसेच अपक्षांपैकी कोणाला कोणते पद मिळते याची चर्चा सुरू आहे. अलीकडेच हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या मनसेलाही त्यात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हिंदुत्वाची कास सोडून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर घरोबा केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी ‘उठाव’ केला. त्यांना छोटे पक्ष व अपक्ष अशा 10 जणांनी साथ दिली. त्याशिवाय, मनसे, बहुजन विकास आघाडी यासारख्या पक्षांनीही शिंदे सरकारच्या पारड्यात आपले मत टाकले. याची पोचपावती म्हणून त्यांना शिंदे मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, असे सांगितले जाते. तसे झाल्यास मनसे आणि बहुजन विकास आघाडी या दोघांना पहिल्यांदाच मंत्रीपद मिळेल.

- Advertisement -

सन 2006मध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर 2009मध्ये मनसेचे 13 उमदेवार विधानसभेवर गेले होते. पण नंतर 2014 आणि 2019मध्ये केवळ प्रत्येकी एकच आमदार विजयी झाला. 2019च्या निवडणुकांमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लोबोल करणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एप्रिल-मे महिन्यांमध्ये पवित्रा बदलला आणि थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर दिला. हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर आधीपासून होता, मात्र अलीकडच्या काळात तो केंद्रस्थानी आला. यादरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आशीष शेलार यांच्या राज ठाकरेंबरोबरच्या गाठीभेटीही वाढल्या. त्यामुळे मनसे भाजपाच्या जवळ जात असल्याची चर्चा सुरू झाली.

डोंबिवली- कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्यात फारसे सख्य नव्हते. मात्र सोमवारच्या बहुमत चाचणीच्या वेळी राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या पारड्यात मत टाकले. त्याआधी राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा अध्यक्षपद या निवडणुकांमध्येही मनसेने भाजपाला मदत केली होती. त्यामुळेच मनसेचा एकच आमदार असला तरी, त्याला किमान राज्यमंत्रीपद मिळेल, अशी चिन्हे आहेत.

- Advertisement -

बाळा नांदगावकर विधान परिषदेवर?
राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे बाळा नांदगावकर हे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाच्या पाठबळावर विधान परिषदेवर जातील, अशी शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी मागील महाविकास आघाडी सरकारच्यावतीने नावांची यादी पाठविली होती, परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावर निर्णय घेतला नाही. आता शिंदे सरकार राज्यपालांकडे नव्याने पाठवेल, त्यात बाळा नांदगावकर यांचे नाव असेल, असे सांगितले जाते.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -