घररायगडकर्जतमध्ये बहरतंय कृषी पर्यटन!

कर्जतमध्ये बहरतंय कृषी पर्यटन!

Subscribe

निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कर्जतमधील काही शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीला छेद देत कृषी पर्यटनपूरक व्यवसायाकडे आपली वाटचाल सुरू केली शहरी पर्यटकांचा त्याला भरभरून प्रतिसादही लाभत आहे.

आठवड्यात सलग पाच दिवस काम करायचे आणि वीकेंडला निसर्गरम्य वातावरणात निवांत क्षण घालवायचे हा फंडा अलीकडे मोठ्या प्रमाणात रूढ होत चालला आहे. नेमके हेच हेरून निसर्गाच्या कुशीत वसलेल्या कर्जतमधील काही शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीला छेद देत कृषी पर्यटनपूरक व्यवसायाकडे आपली वाटचाल सुरू केली शहरी पर्यटकांचा त्याला भरभरून प्रतिसादही लाभत आहे. मुंबई आणि पुण्याच्या मध्यावर असल्याने येथे येणे सहज आणि सोपे झाले आहे. रेल्वेप्रमाणे रस्त्यांचेही जाळे बर्‍यापैकी पसरल्याने येणार्‍यांनाही ते सोयीचे ठरत आहे. तालुक्यावर झालेली निसर्गाची मुक्त हस्ते उधळण पहायला मिळते. उंच उंच डोंगर, दर्‍या, पावसाळ्यात कोसळणारे शुभ्र फेसाळ धबधबे, जैवविविधता यामुळे पर्यटकांसह गिर्यारोहकांचीही पावले आपोआप येथे वळत आहेत. स्वाभाविक नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस असण्याचे स्वप्न अनेकांनी पूर्ण केले असून, कित्येक ठिकाणी त्याची बांधकामेही सुरू आहेत. त्यामुळेच सर्वाधिक फार्म हाऊस असलेला तालुका अशी शेखी कर्जत तालुक्याला मिरवता येत आहे.

यापूर्वी तालुक्यात रिसॉर्ट होते, पण अगदी बोटावर मोजण्या इतकेच! त्यात एखादा स्विमिंग पूल आणि थोडी फार बाग, एखाद दुसरे कॉटेज असायचे. मात्र आता हे स्वरुप पूर्ण बदललंय. मोठे क्षेत्रफळ, चोहोबाजूला हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे, अलिशान कॉटेज आणि त्यासमोर निळाशार पाण्याचा स्विमिंग पूल, पावसाळा नसूनही पावसाचा आनंद देणारा रेन डान्स शॉवर, डीजेच्या तालावर या रेन डान्स शॉवरखाली थिरकत नखशिखांत ओलीचिंब होणारी तरुणाई पहायला मिळत आहे. बच्चे कंपनीसाठी घसरगुंड्या, सीसॉ आदी पर्याय आहेत.

- Advertisement -

दिवसेंदिवस रिसॉर्टची संख्या वाढत असल्याने पर्यटक तथा ग्राहक आपल्या रिसॉर्टकडे जास्तीत जास्त कसे वळतील यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविण्यात आल्या आहेत. खवय्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जम्बो थाळी, शेतकरी व्हेज थाळी, कोळीवाडा थाळी आदीमध्ये चमचमीत पदार्थांची रेलचेल असते.

‘पाहुणचार’ रिसॉर्टमध्ये शेतकरी थाळी 1 हजार 500, कोळीवाडा थाळी 2 हजार 500, तर पाहुणचार स्पेशल थाळी 3 हजार असे दर असूनही पर्यटक आनंदाने याचा आस्वाद घेत असल्याचे रिसॉर्टचे मालक आबासाहेब पवार सांगतात. एक थाळी मागवली की त्यात पाच ते सहाजण सहज पोटभर जेवतात. या थाळ्यांमध्ये विविध प्रकारच्या मासे, चिकन, मटण याचा समावेश असतो. ‘उत्कर्ष’ रिसॉर्टचे मालक उदय पाटील यांनी तर त्यांच्याकडे येणारे काही ग्राहक सकाळच्या नाश्त्याला कांदा पोहे, इडली, मिसळ ऐवजी सुकटीची चटणी आणि भाकरीची विशेष फर्माईश करत असल्याचे कौतुकाने सांगितले. काही रिसॉर्टमध्ये प्रतिदिन चहा, नाश्त्यासह दोनवेळचे जेवण 2 हजार, तर काही रिसॉर्टमध्ये दीड हजारात उपलब्ध करून देण्यात येते.

- Advertisement -

शनिवार, रविवारी तर आगाऊ आरक्षणाशिवाय प्रवेश मिळणे अवघड असते. या रिसॉर्टमधून नुसता वीकेंड साजरा होतो असे नाही तर वाढदिवस, स्नेहसंमेलन, साखरपुडा असे छोटेखानी कार्यक्रमही होतात. विविध पिकांचे उत्पादन कसे घेतले जाते हेही पर्यटकांना अनेक ठिकाणी पहावयास मिळते. अशाची सांगड घालत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ठेवण्यात आलेला व्यावसायिक दृष्टीकोन वाखाणण्याजोगा असून, कृषी पर्यटनासाठी यापुढे नक्कीच अच्छे दिन असतील यात शंका नाही.

पेठचा किल्ला, कोंढाणे-आंबिवली लेणी, प्राचीन होळकर तलाव, कडावचे गणेशाचे जागृत बाल दिगंबर मंदिर, पळसदरी येथील श्री स्वामी समर्थांचा मठ, वामनराव पै विद्यापीठ आदी गर्दीची ठिकाणे असूनही कर्जतला अपेक्षित असा पर्यटनाचा दर्जा मिळालेला नाही. यासाठी शासन स्तरावर सकारात्मक विचार झाला तर पर्यटनाबरोबर रोजगाराच्याही संधी उपलब्ध होतील.

धबधब्यांवरील बंदी उठवावी

सोलन पाडा, आषाणे कोषाणे धबधबा आणि इतर अनेक धबधबे पावसाळ्यात कोसळताना पहाणे नेत्रसुख असते. यावेळी वर्षा सहलीच्या निमित्ताने हजारो पर्यटक दूरदूरहून येतात. मात्र या ठिकाणी काही पर्यटकांचा अपघाती मृत्यू झाल्याने धबधब्यावर जाण्यास सरसकट बंदी घालण्यात आल्याने पर्यटक कमी झाले. परिणामी त्या-त्या भागातील व्यवसाय, रोजगार बुडाला आहे. त्यामुळे ही बंदी उठवावी जेणेकरून शासन पर्यटनाला खरोखर प्रोत्साहन देतेय असा संदेश पोहचेल.

– ज्योती जाधव, (लेखक कर्जत परिसरातील वार्ताहर आहेत)

हेही वाचा –

अनधिकृत बांधकामे! तेरी भी चुप, मेरी भी चूप!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -