घररायगडरासायनिक सांडपाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती पोलीस बंदोबस्तात

रासायनिक सांडपाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती पोलीस बंदोबस्तात

Subscribe

वडवली गावाजवळ पाईपलाईन फुटून पाणी शेतात गेल्याने शेजारील गावातील ग्रामस्थांनी याठिकाणी संताप व्यक्त केला. पाईपलाईन दुरुस्त करून दिली जाणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिला.

वडवली गावाजवळ शनिवारी सायंकाळी महाड औद्योगिक विकास महामंडळाची रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली होता. तर शेजारील भातशेतात देखील रासायनिक सांडपाणी गेल्याने शेतकर्‍यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर या वाहिनीची दुरुस्ती पोलीस बंदोबस्तात सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाड एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून औद्योगिक विकास महामंडळाच्या पाईपलाईनमधून वराठी गावाजवळ खाडीत सोडले जाते. ही पाईपलाईन जीर्ण होऊन अनेकवेळा फुटल्याने खाडीपट्टा विभागात शेतात पाणी जाऊन शेतकर्‍यांच्या शेताचे नुकसान झाले आहे. पाईपलाईन फुटण्याचा प्रकार अद्याप सुरुच असून शनिवारी सायंकाळी वडवली गावाजवळ ही पाईपलाईन फुटली. त्यामुळे रासायनिक सांडपाणी रस्त्यावर आले. शिवाय नाल्यातून हे पाणी शेजारील शेतात गेले. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली तर शेतजमिनीचे देखील नुकसान झाले.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षापासून पाईपलाईन फुटण्याचा प्रकार सुरूच असून याबाबत औद्योगिक विकास महामंडळ ठोस कार्यवाही करताना दिसत नाही. यामुळे शेतजमिनीचे नुकसान सुरूच आहे. वडवली गावाजवळ पाईपलाईन फुटून पाणी शेतात गेल्याने शेजारील गावातील ग्रामस्थांनी याठिकाणी संताप व्यक्त केला. पाईपलाईन दुरुस्त करून दिली जाणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिला. यामुळे औद्योगिक विकास महामंडळाने याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून पाईपलाईनची दुरुस्ती करण्याचे काम सुरु केले आहे.

सदर पाईपलाईन सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु झाल्यापासून टाकण्यात आली आहे. सुरूवातीला कंपन्या कमी प्रमाणात होत्या. मात्र ,औद्योगिक क्षेत्रात कंपन्याची संख्या वाढली आहे. यामुळे ही पाईपलाईन कमी आणि कुचकामी ठरू लागली आहे. यामुळे वारंवार महाड औद्योगिक विकास क्षेत्र ते वराठीपर्यंत वारंवार पाईपलाईन लिकेज आणि फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटली त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असल्याने सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात या पाण्यावर नक्की प्रक्रिया होते की नाही असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

वडवली गावाजवळ पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर आणि नाल्यात गेले. यामुळे पाईपलाईनमधून वाहून नेणारे सांडपाणी तत्काळ थांबवले गेले. गेली दोन दिवस दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे.

– प्रमोद भांगरे, एमआयडीसी, महाड

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -