घररायगडरोह्यात बाह्यवळण मार्गावर ट्रक चालकांचा ‘श्रमपरिहार’!

रोह्यात बाह्यवळण मार्गावर ट्रक चालकांचा ‘श्रमपरिहार’!

Subscribe

शहरा बाहेरून गेलेला एमआयडीसी बाह्यवळण रस्ता हा प्राईड हॉटेल ते बंदर पकटी या दरम्यान अवजड वाहनांचा बेकायदेशीर थांबा झाल्याचे तेथे उभ्या असलेल्या ट्रक, डंपरवरून दिसत आहे. विश्रांतीच्या नावाखाली या वाहनांचे ड्रायव्हर आणि अन्य हौशी दिवसरात्र अड्डा जमवून नशापान करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शहराचा मानबिंदू असलेल्या नदी संवर्धन प्रकल्पात बंदरापर्यंत केलेल्या जॉगिंग ट्रॅक आणि बाकड्यांवर बसून अनेक चालक दारू, गांजा, चरस यांचा मनमुराद आस्वाद घेताना दिसतात. नशापान केल्यानंतर चालक वाहन घेऊन जात असल्याने अपघाताचा धोका नाकारता येत नाही. या आधीही अनेक छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची वर्दळ कमी असल्याने त्याचा गैरफायदा हे नशाबाज चालक घेत असल्याचे दिसत आहे. या ठिकाणी विनाकारण थांबण्यास या सर्व वाहनचालकांना मनाई करीत अनैतिक कृत्ये करणार्‍यांवर नगरपरिषद आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

- Advertisement -

कुंडलिका नदी संवर्धन आणि सुशोभीकरण प्रकल्पामुळे नदीसह शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. दमखाडी ते बंदरापर्यंत हे काम झाल्यामुळे यालाच लागून असलेल्या बाह्यवळण रस्त्यावरून साळावस्थित जेएसडब्ल्यू आणि इंडो एनर्जी जेट्टीमधील लोखंड, कोळसा वाहतूक करणारे डंपर जात असतात. यासोबतच अन्य अवजड वाहतूक करणारी वाहने या भागात नेहमी उभी करण्यात येतात. दुपारी आणि रात्री मालाने भरलेलीही वाहने चालक या ठिकाणी उभी करतात आणि एकत्रितपणे मैफल जमवितात असे अनेकदा दिसून येते.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी हे सर्व प्रताप आता सर्रासपणे होत असल्याचे दिसत आहे. नदी संवर्धन प्रकल्पाच्या मुख्य भागात मात्र नगर परिषद आणि पोलिसांच्या खड्या पाहर्‍यामुळे कोणतेही गैरकृत्य करण्याचे धाडस गर्दुले किंवा दारूडे करताना दिसत नाहीत. मात्र बंदर परिसर आडबाजूला येत असल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांनी आता बस्तान मांडले आहे. अनलॉक झाल्यानंतर पर्यटक नदी संवर्धन प्रकल्प पहायला आले तर त्यांना या सर्व प्रकारामुळे असुरक्षित वाटेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -