घररायगडपाण्याच्या शोधात रस्ता ओलांडताना दुर्मिळ प्राणी बनत आहेत वाहनांची शिकार

पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडताना दुर्मिळ प्राणी बनत आहेत वाहनांची शिकार

Subscribe

गेली महिनाभरापासून संपूर्ण जिल्ह्यातील वातावरणात प्रचंड बदल झाला असून तापमान जवळपास ४० अंशाच्या वर जाऊन पोहोचले आहे. यामुळे कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. अशातच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने माणसांसह पशु पक्षी देखील व्याकुळ झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या शोधात असलेले वन्य जीव यामुळे आपला जीव गमावून बसत आहेत.

महाड – निलेश पवार

गेली महिनाभरापासून संपूर्ण जिल्ह्यातील वातावरणात प्रचंड बदल झाला असून तापमान जवळपास ४० अंशाच्या वर जाऊन पोहोचले आहे. यामुळे कडाक्याच्या उन्हात बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. अशातच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने माणसांसह पशु पक्षी देखील व्याकुळ झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या शोधात असलेले वन्य जीव यामुळे आपला जीव गमावून बसत आहेत.

- Advertisement -

महाड सह संपूर्ण कोकणामध्ये तापमानातील वाढता उष्मा डोकेदुखी बनत चालली आहे. वातावरणातील बदलामुळे संपूर्ण कोकणातील तापमान आता 40° अंश सेल्सिअस हुन अधिक गेलेले दिसून येत आहे, यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या देखील उद्भवू लागली आहे. विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे माणूस पिण्याच्या पाण्याच्या शोधात वणवण करत असताना दुसरीकडे जंगलातील वन्य प्राणी देखील पिण्याच्या पाण्याच्या शोधात मानवी वस्ती कडे वळत आहेत. जंगलातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कडाक्याच्या उन्हाळ्यात आटून गेले आहेत, यामुळे वन्य प्राणी आणि पशुपक्ष्यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. वनविभागाकडून वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पुन्हा कार्यान्वित करणे आदी उपक्रम फक्त कागदावर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन्यप्राणी मानवी वस्ती आणि धरण क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याच्या शोधात येत आहेत. अनेक वेळा या प्राण्यांना वर्दळीचा रस्ता ओलांडत यावे लागत असल्याने अनेक दुर्मिळ प्राणी वेगवान वाहनांचे बळी ठरत आहेत.

महाड तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर केंबुर्ली  गावानजीक अशाच पद्धतीने एका बिबट्याला उडवल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. गेली महिनाभरात महाड विन्हेरे खेड या पर्यायी मार्गावर कस्तुरी मांजर आणि रान मांजर हे दुर्मिळ प्राणी रस्त्यावर वाहनांच्या धडकेने मृत पावलेले आढळले. याच मार्गावर कांही महिन्यापूर्वी रस्त्यालगत एक रानडुक्कर वाहनाच्या धडकेने मृत अवस्थेत आढळून आला होता. यातील ससे, साळींदर, असे लहान प्राणी वाहनचालक शक्यतो वाहनांची धडक बसताच उचलून घेऊन जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. प्रकारचे दुर्मिळ प्राणी रस्ता ओलांडत असताना वाहन चालकांनीही आपल्या वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. मात्र वेगाने वाहणाऱ्या या वाहनांमुळे या दुर्मिळ प्राण्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

- Advertisement -

कोकण रेल्वेच्या भोगद्यांमध्ये अनेक ठिकाणी दगडातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे डोह तयार झाले आहेत. यामुळे वन्य प्राणी या बोगद्यात शिरतात मात्र एखादी रेल्वे आल्यास या वन्य प्राण्यांना बाहेर पडण्यास शक्य होत नाही. त्यामुळे रेल्वेची धडक बसून हे वन्य प्राणी मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. हे वन्य प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधात साधारणपने रात्रीच्या वेळेस बाहेर पडतात. यामुळे रात्रीच्या सुमारास वाहन चालकांनी जंगल भागातून प्रवास करत असताना वन्यप्राणी गाडीच्या चाकाखाली येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे मत प्राणी मित्रांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -