घररायगडरायगडातील निकाल शिंदे गटाला अंतर्मुख करायला लावणारा

रायगडातील निकाल शिंदे गटाला अंतर्मुख करायला लावणारा

Subscribe

तीन आमदारांसाठी धोक्याची घंटा

 

 

- Advertisement -

रामनाथ चौलकर: पनवेल
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल शिंदे गटाला अंतर्मुख करायला लावणारा असून, या गटाच्या तीन आमदारांसाठी धोक्याची घंटा वाजविणारे ठरले आहेत. या निकालाने जिल्ह्यात महाविकास आघाडीची मोट अधिक घट्टपणे बांधली जाण्याचे संकेत यातून मिळत आहेत.
गेल्या रविवारी महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांतील १ हजार १६५ ग्रामपंचायतींपैकी १ हजार ७९ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली आणि सोमवारी निकाल जाहीर झाले. जिल्ह्यात १६ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली होती. राज्यात शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडून त्याने भाजपशी संधान बांधल्याने एरव्ही दुर्लक्षित होणारी ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची करण्यात आली होती. निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाने आपलीच सरशी झाल्याचे म्हटले आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या आमदारांच्या मतदारसंघात जनमत कुठे झुकणार, हा कमालीचा औत्सुक्याचा भाग ठरलेला होता. रायगडात शिंदे गटातील महाडचे भरत गोगावले, कर्जतचे महेंद्र थोरवे आणि अलिबागचे महेंद्र दळवी या तिघांच्याही मतदारसंघात ग्रामपंचायतीत निवडणूक झाली. मात्र आलेला निकाल शिंदे गटाला फारसा शोभा देणारा नसल्याचे दिसून येते.

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूकही प्रतिष्ठेची करण्यात आली होती. तेथे आमदार थोरवे यांचाच करिष्मा चालणार, असे वातावरण त्यांच्या समर्थकांकडून तयार करण्यात आले होते. परंतु कर्जतमध्ये शिंदे गटाचे पूर्णपणे पानिपत झाले, तर खालापुरातही शिंदे गटाला मतदारांनी सपशेल नाकारले आहे. नाही म्हणायला शिंदे गटाचा मित्र पक्ष असलेल्या भाजपला तुपगावची ग्रामपंचायत काबीज करता आली तेवढेच काय ते समाधान या गटाला मिळाले. अलिबागमध्ये शेकापकडील ग्रामपंचायती शिंदे गटाने स्थानिक आघाडी करून हिसकावून घेतल्या आहेत. हा शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर शिंदे गटाला दिलासा देणारी कामगिरी करून घेण्याची जबाबदारी आमदार दळवी यांनी पार पाडली आहे. माणगावात एक ग्रामपंचायत शेकापला मिळाली इतकेच काय ते त्या पक्षासाठी समाधान ठरले. पनवेलमध्ये मात्र शेकापच्या ताब्यातील ग्रामपंचायत आपल्याकडे खेचून घेण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. ग्रामीण भागातील विजय भाजपसाठी उत्साह वाढविणारा आहे.
कट्टर शिवसैनिक अद्याप उद्धव ठाकरे यांच्याकडेच झुकल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कुरबुरीशिवाय ठाकरे गट आणि दोन्ही काँग्रेस असे तीन पक्ष आगामी निवडणुकांत एकत्र आले तर ती शिंदे गट, तसेच भाजप या दोघांसाठी कसोटी ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुका औत्सुक्याच्या ठरणार असून, त्यांच्या निकालांत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा कल बराचसा स्पष्ट झालेला असेल. जिल्ह्यातील राजकीय कानोसा घेतल्यास महाविकास आघाडीची मोट अधिक घट्ट बांधण्यासाठी प्रयत्न होण्याचे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणूक लिटमस चाचणी

या निवडणुकीत शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना त्वेषाने रिंगणात उतरले होते. येत्या काही दिवसांत नगर पालिका, पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदींची निवडणूक होत असल्याने त्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लिटमस चाचणी असल्याचे मनाशी बांधून हे दोन्ही गट निवडणुकीत आमने-सामने आले होते. यात ठाकरे गटाला मिळालेला मतदारांचा पाठिंबा शिंदे गटाच्या तीन आमदारांसाठी विचार करायला लावणारा आहे.

सरपंचपद महाविकास आघाडीला

महाडच्या खरवली ग्रामपंचायतीची निवडणूक आमदार गोगावले यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीचा सुफडा साफ होणार अशी हवा निर्माण करण्यात आली होती. प्रत्यक्षात प्रतिष्ठेचे सरपंचपद महाविकास आघाडीला मिळाले, तर १० गोगावले समर्थक सदस्य निवडून आले. या निकालाने महाड विधानसभा मतदारसंघात शिंदे गटासाठी आलबेल वातावरण असल्याचे मानता येणार नाही. या मतदारसंघातील माणगावात एक ग्रामपंचायत शिंदे गटाला, तर एक महाविकास आघाडीकडे गेली आहे. पोलादपुरात बाळासाहेबांच्या शिवसेनला बर्‍यापैकी यश मिळाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -