घरक्रीडाविस्मयकारक चंद्रा!

विस्मयकारक चंद्रा!

Subscribe

भारताचा माजी लेगस्पिनर भागवत सुब्रमण्यम चंद्रशेखर उर्फ चंद्राचा आज ७६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अनेक क्षण डोळ्यासमोर तरळतात. चंद्राची कहाणी विस्मयकारक आहे. पाचव्या वर्षी झालेल्या पोलिओमुळं त्याला उजवा हात वापरणे अवघड जाऊ लागले. परंतु, नेट्समधील अथक सरावाने तो गोलंदाजीत पारंगत झाला. झपकन येणाऱ्या त्याच्या चेंडूमुळे फलंदाज बिचकायचे. त्याचा गोलंदाजीचा १०-१२ पावलांचा स्टार्ट, त्याच्या स्टार्टबरोबर स्टेडियममधील प्रेक्षकही उत्फुल्लीत होत असत. चंद्रा चेंडू दोन्ही हातात पकडत असे. डावा हात वरती गेल्यावर उजवा हात गर्रकन खाली येत, मग तो उजवा हात डाव्या मांडीवर आपटल्यावर प्रेक्षक कल्ला करत असत.

भारत म्हणजे फलंदाज आणि फिरकीपटू घडवण्याची जणू खाणच! भारतीय क्रिकेटला अनेक महान फिरकीपटू लाभले आहेत आणि त्यांच्यापैकीच एक म्हणजे भागवत सुब्रमण्यम चंद्रशेखर उर्फ चंद्रा. चंद्राचा आज ७६ वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अनेक क्षण डोळ्यासमोर तरळतात. आजही इंग्लंडमध्ये कसोटी जिंकणे हे प्रत्येक संघाचे लक्ष्य असते आणि भारताला पहिल्यांदा चंद्राच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच हे लक्ष्य गाठणे शक्य झाले होते. ओव्हलवर त्याच्या गुगली, टॉपस्पिनने रे इलिंगवर्थच्या इंग्लिश संघाची दाणादाण उडवली. जेमतेम तीन तासातच इंग्लंडचा दुसरा डाव १०१ धावात आटोपला. भारताने चौथ्या डावात १७३ धावांचे आव्हान ४ विकेट राखून पूर्ण केले. लेगस्पिनर चंद्राने ३८ धावातच ६ मोहरे टिपत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. इतकेच नव्हे तर शतकातील सर्वोत्तम भारतीय गोलंदाज म्हणून विस्डेनने चंद्रालाच पसंदी दिली.

सोमवार २३ ऑगस्ट १९७१ हा दिवस लेगस्पिनर चंद्राचा होता. तब्बल २६ कसोटीत अपराजित असलेल्या इंग्लंडचा नक्षा चंद्रा, वेंकट, बेदी (केवळ एकच षटक त्याला पुरेसं ठरलं) यांनी उतरवला. अबिद, सोलकर यांनी ६ षटके टाकल्यावर वाडेकरने वॅक्सहौल एन्डकडून चंद्रा आणि पॅव्हेलियन एन्डकडून वेंकट असा दुतर्फी फिरकी मारा सुरू केला. त्यावेळी इंग्लंडचा बिनबाद २३ असा धावफलक दिसत होता. मात्र, जॉन जेमिसन धावचीत झाला तो चंद्रामुळेच. डावखुरा एड्रीच जेमतेम ५ चेंडू टिकला. चंद्राने त्याचा त्रिफळा उडवला. चेंडूचा वेग इतका भन्नाट होता की स्टंप उडवून चेंडू पुन्हा चंद्राच्या हातात आला. फ्लेचर चंद्राच्या पुढच्याच चेंडूवर माघारी परतल्याने उपाहाराला इंग्लंडची ३ बाद २४ अशी अवस्था होती. चंद्रा आणि वेंकटने यापुढील फलंदाजांनाही फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. इंग्लंडचा दुसरा डाव १०१ धावांवर आटोपला. इंग्लंडची ही भारताविरुद्धची सर्वात कमी धावसंख्या! या डावात ३८ धावात ६ मोहरे टिपणाऱ्या चंद्राने सामन्यात ११४ धावात ८ विकेट्स काढल्या.

- Advertisement -

चंद्राची कहाणी विस्मयकारक आहे. पाचव्या वर्षी झालेल्या पोलिओमुळं त्याला उजवा हात वापरणे अवघड जाऊ लागले. पाण्याचा ग्लास पकडणंही त्याला जड जायचं. परंतु, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो विलक्षण रमायचा. त्याला फलंदाजीत विशेष रस! बऱ्याच प्रयत्नांनंतर तो टेनिस चेंडूने गोलंदाजी करू लागला. नेट्समधील अथक सरावाने तो गोलंदाजीत पारंगत झाला. झपकन येणाऱ्या त्याच्या चेंडूमुळे फलंदाज बिचकायचे. लेगस्पिनचा त्याला लळा लागला. गुगली तर त्याचं ब्रह्मास्त्र! त्याचे चेंडू झपकन वर उसळायचे आणि स्टंप गटांगळ्या खायचे. म्हैसूर निवड समितीने त्याला पहिली संधी दिली ती केरळविरूद्ध. मात्र, त्या सामन्यात त्याने फारशी गोलंदाजी केलीच नाही, पण पुढच्या ३ सामन्यांत त्याने २५ मोहरे टिपले. दुलीप स्पर्धा पदार्पणात त्याने ५ गडी बाद केले. त्यामुळे लवकरच त्याच्यासाठी भारतीय संघाची दारं खुली झाली.

त्याने १९६३-६४ मोसमात माईक स्मिथच्या इंग्लंडविरुद्ध मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये कसोटीत पदार्पण केलं. पहिल्याच डावात त्यानं माइक स्मिथ, बॅरी नाईट, बिन्क्स आणि प्राईस या चौघांना माघारी पाठवलं. नाडकर्णी, दुराणी, बोर्डे असे नावाजलेले फिरकीपटू संघात असताना या म्हैसूरी युवकाने आपली छाप पाडली. ब्रेबॉर्नशी चंद्राचे अतूट नातं आहे. याच मैदानावर चंद्राने १९६४ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ फलंदाजांना बाद करत भारतीय विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बापू नाडकर्णीचीही चंद्राला उत्तम साथ लाभली.

- Advertisement -

प्रसन्न, वेंकट, चंद्रा, बेदी या फिरकी चौकडीमध्ये चंद्राचे वेगळेपण चटकन नजरेत भरायचं. त्याचा गोलंदाजीचा १०-१२ पावलांचा स्टार्ट, त्याच्या स्टार्टबरोबर स्टेडियममधील प्रेक्षकही उत्फुल्लीत होत असत. चंद्रा चेंडू दोन्ही हातात पकडत असे. डावा हात वरती गेल्यावर उजवा हात गर्रकन खाली येत, मग तो उजवा हात डाव्या मांडीवर आपटल्यावर प्रेक्षक कल्ला करत असत. भारतातील अनेक स्टेडियम्समध्ये (ब्रेबॉर्न, चेपॉक, वानखेडे, चिन्नास्वामी, कोटला) याची प्रचिती यायची.

ब्रेबॉर्नच्या नॉर्थ स्टॅन्डमध्ये बसून याची अनुभूती बऱ्याच दुलीप, रणजी, इराणी करंडक सामन्यांत घेतली आहे. उपहारानंतर खेळ रटाळ होता क्षणी काही प्रेक्षक ट्रान्झिस्टरवर विविध भारतीवर सिनेसंगीत ऐकण्यात दंग व्हायचे. चंद्रा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असला आणि विविध भारतीवर मुकेशचं गाणं लागलं की त्याची कळी खुलायची. अशावेळी त्याच्या गोलंदाजीला विलक्षण धार यायची अन फलंदाज गर्भगळीत व्हायचे. गॅरी सोबर्सच्या बलाढ्य विंडीजविरुद्ध चंद्राने कमालच केली. बायनो, कन्हाय, बुचर, लॉईड, हॉलफर्ड, हेंड्रिक्स, ग्रिफिथ असे सात मोहरे गारद केल्यावर चंद्राने दुसऱ्या डावातही चार बळी टिपले. हा कसोटी सामना पाहण्याची संधी मला मिळाली. वाडेकरने चंद्राच्या गोलंदाजीवर टिपलेले बायनो आणि गिब्सचे झेल अप्रतिमच!

व्हीव रिचर्ड्स या विस्फोटक फलंदाजाने १९७४ च्या मोसमात बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. चंद्राने दोन्ही डावात त्याची झटपट (४ आणि ३ धावा) पॅव्हेलियनमध्ये रवानगी केली. दिल्ली कसोटीत पतौडीच्या गैरहजेरीत कर्णधारपदी वेंकटची निवड करण्यात आली आणि त्याने चंद्राच्या जागी बेदीला संधी दिली. या कसोटीत रिचर्ड्सने १९२ धावा तडकावल्या. कोलकाता कसोटीत पतौडी परत आल्यामुळं वेंकट बाहेर गेला आणि चंद्राचे संघात पुनरागमन झालं. संगीत खुर्चीचा खेळ भारतीय क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे रंगतोय. ईडन गार्डन्स कसोटीत चंद्राने लॉईड, कालिचरण, जुलियन यांना बाद करून भारतीय विजयात खारीचा वाटा उचलला. वानखेडेवरील उद्घाटनच्या कसोटीत त्याने रिचर्ड्सला (१) झटपट बाद केलं, पण लॉईडच्या विंडीजने ही मालिका ३-२ अशी जिंकली.

१९७६ च्या न्यूझीलंड दौऱ्यात ऑकलंडला झालेल्या पहिल्याच कसोटीत बेदी दुखापतग्रस्त असल्यामुळे सुनील गावस्करला कर्णधारपदाची धुरा सांभाळावी लागली. प्रसन्नाने ११, तर चंद्राने ८ गडी बाद केले आणि भारताने गावस्करच्या नेतृत्वात प्रथमच खेळताना कसोटी जिंकली. बेदीच्याच नेतृत्वाखाली १९७७-७८ मध्ये भारताने मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला २२२ धावांनी धूळ चारली. चंद्राने या सामन्यात १०४ धावांत १२ मोहरे टिपले, तर अॅडलेड कसोटीत त्याने कांगारूंचा निम्मा संघ गारद केला. १९७८-७९ पाकिस्तान दौऱ्यात मात्र भारताला मालिका गमवावी लागली आणि इथेच भारतीय फिरकीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. प्रसन्नाची कसोटी कारकीर्द संपली. चंद्राच्या फिरकीतील जादूदेखील लुप्त होत गेली.

१९६०-७० च्या दशकात चंद्राने भारतीय फिरकीची धुरा समर्थपणे वाहिली. ५८ कसोटीत २४२ मोहरे त्याने टिपले. सामन्यात १० अथवा जास्त मोहरे गारद करण्याचा पराक्रम त्याने दोनदा केला, तर त्याने १६ वेळा एका डावात प्रतिस्पर्ध्याचा निम्मा संघ बाद केला. चंद्रा ५८ कसोटी खेळला, त्यापैकी १४ सामने भारताने जिंकले. या १४ विजयांत त्याने ९८ मोहरे टिपून हातभार लावला. त्याचवेळी एक बाब नजरेआड करता येणार नाही. दुखापती, अपघात, निवड समितीच्या गफलती यामुळे साधारण साडेतीन वर्षात (१९६७-१९७०) त्याला २९ कसोटी सामन्यांना मुकावं लागलं. अजित वाडेकरच्या संघाने कसोटी मालिका विजयांची हॅटट्रिक साजरी केली ती १९७२-७३ च्या मायदेशातील मालिकेत टोनी लुईसच्या इंग्लंडला २-१ असे हरवून. या मालिकेत चंद्राने ३५ मोहरे टिपण्याचा पराक्रम केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -