घरक्रीडादुखापतीला अ‍ॅक्शन कारणीभूत नाही!

दुखापतीला अ‍ॅक्शन कारणीभूत नाही!

Subscribe

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. त्याला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. बुमराह सध्या जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तो या मालिकेत खेळू न शकणे हा भारतासाठी धक्का आहे. मात्र, बुमराहशिवायही भारत चांगली कामगिरी करू शकेल, असे भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराला वाटते. तसेच बुमराहच्या दुखापतीला त्याची गोलंदाजीची वेगळी शैली (अ‍ॅक्शन) कारणीभूत नाही, असे नेहरा म्हणाला.

बुमराहला जी दुखापत झाली आहे, त्याचा गोलंदाजीच्या शैलीशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे बुमराहने त्याची गोलंदाजीची शैली बदलण्याची गरज नाही. त्याने जर शैली बदलली, तर तो चांगली गोलंदाजी करू शकणार नाही. तो जेव्हा पुनरागमन करेल, तेव्हा गोलंदाजी शैली न बदलता, तो पूर्वीच्याच वेगाने आणि पद्धतीने गोलंदाजी करेल याची मला खात्री आहे. त्याची गोलंदाजीची शैली विचित्र आहे असे म्हटले जाते. मी याच्याशी सहमत नाही. चेंडू जेव्हा त्याच्या हातातून बाहेर पडणार असतो, तेव्हा त्याचे शरीर इतर गोलंदाजांप्रमाणेच असते. फक्त त्याचा डावा हात इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा असतो. मात्र, असे असतानाही त्याची गोलंदाजीची शैली मलिंगापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे. मलिंगाचा गुडघा आणि मागचा पाय वाकत असल्याने तो भालाफेकपटू असल्यासारखे वाटते, असे नेहरा म्हणाला.

- Advertisement -

नेहराची भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते. खासकरून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली होती. मात्र, कारकिर्दीदरम्यान दुखापतींमुळे त्याला बराच काळ मैदानाबाहेर रहावे लागले होते. त्यामुळे गोलंदाजांना होणार्‍या दुखापतींविषयी त्याला बरीच माहिती आहे. बुमराह किती दिवसांत मैदानात परतेल असे वाटते, असे विचारले असता नेहराने सांगितले, बुमराहला जी दुखापत झाली आहे, त्याला औषधोपचार नाही. त्याला योग्य विश्रांती करावी लागेल. तो किती काळात मैदानात परतेल हे सांगणे अवघड आहे. बुमराह दोन महिन्यांत पूर्णपणे फिट होऊ शकेल किंवा कदाचित सहा महिन्यांनंतरही तो फिट नसेल.

सतत विश्रांतीची गरज नाही!

- Advertisement -

क्रिकेटचे सध्या तीन प्रकार (कसोटी, एकदिवसीय, टी-२०) असल्यामुळे खेळाडूंना विश्रांतीला फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन बुमराह, शमी, भुवनेश्वर या प्रमुख गोलंदाजांना काही सामन्यांनंतर विश्रांती देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, खेळाडूंना सतत विश्रांती देण्याची गरज नाही, असे नेहराला वाटते. बुमराहच्या कारकिर्दीला सुरुवात होऊन फारसा वेळ झालेला नाही. त्यामुळे तो जितके जास्त सामने खेळेल, तितका त्याचा फायदा होईल. त्याच्या खेळात सुधारणा होईल. तो आता फक्त २५-२६ वर्षांचा आहे. बुमराहने केवळ तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्यामुळे त्याला किंवा इतर गोलंदाजांना सतत विश्रांती देण्याची गरज नाही, असे नेहराने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -