अनिल कुंबळे भारताचा सर्वात मोठा मॅचविनर!

 हरभजन सिंगचे मत

माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू अनिल कुंबळे हा भारताच्या क्रिकेट इतिहासातील बहुधा सर्वात मोठा मॅचविनर होता, असे मत ऑफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केले. हरभजन आणि कुंबळे हे भारताचे दोन सर्वोत्कृष्ट फिरकीपटू मानले जातात. या दोघांनी मिळून अनेक वर्षे भारताच्या फिरकीची धुरा सांभाळली. लेगस्पिनर कुंबळे हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने १३२ कसोटी सामन्यांत ६१९ गडी बाद केले होते, तर हरभजनच्या नावे १०३ कसोटीत ४१७ बळी आहेत. हरभजनला काही वर्षे कुंबळेच्या नेतृत्वातही खेळण्याची संधी मिळाली होती. त्यामुळेच त्याने कुंबळेचे कौतुक केले.

माझ्या मते, अनिल भाई भारतासाठी खेळलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तोच भारताच्या क्रिकेट इतिहासातील बहुधा सर्वात मोठा मॅचविनर होता. त्याचा चेंडू फारसा स्पिन होत नाही असे काही लोक म्हणायचे. परंतु, त्याच्यात जिद्द होती. तुम्ही जर निडर असाल, तर चेंडू फारसा स्पिन न करतातही तुम्ही फलंदाजाला बाद करु शकता हे त्याने दाखवून दिले. अनिल भाईच्या निम्मीही जिद्द तुमच्यात असेल, तर तुम्ही उत्कृष्ट खेळाडू बनू शकता. त्याच्यासोबत इतकी वर्षे खेळायला मिळणे हे माझे भाग्य होते, असे हरभजनने एका मुलाखतीत सांगितले.

कसोटी क्रिकेटप्रमाणेच कुंबळे हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने २७१ एकदिवसीय सामन्यांत ३३७ गडी बाद केले. तसेच कसोटीत एकाच डावात प्रतिस्पर्धी संघाचे १० विकेट घेणारा जिम लेकर यांच्यानंतरचा केवळ दुसरा गोलंदाज होता.