घरक्रीडाअँटोनियो दा सिल्वा, होली क्रॉस हायस्कूल विजेते

अँटोनियो दा सिल्वा, होली क्रॉस हायस्कूल विजेते

Subscribe

अमर हिंद मंडळ- दादर आयोजित अकराव्या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूल आणि मुलींमध्ये होली क्रॉस हायस्कूल संघांनी विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूलने मारवाडी हायस्कूलचा ७ गुणांनी तर होली क्रॉस हायस्कूलच्या मुलींनी के.एम.एस. डॉ. शिरोडकर हायस्कूलचा ४२ गुणांनी पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, संस्थेचे विश्वस्त उर्मिला शेणॉय, उपाध्यक्ष महेंद्र शेट्ये, कार्याध्यक्ष अरुण देशपांडे, कार्योपाध्यक्ष संजय पेडणेकर, कार्यवाह दीपक पडते आदी मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

अमर हिंद शालेय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मारवाडी हायस्कूलने मोहित शर्माच्या अप्रतिम चढायांमुळे पहिल्या डावात २१-१६ अशी आघाडी घेतली. परंतु, दुसर्‍या डावात ऋषिकेश खेडेकरच्या चौफेर चढाया व यश राक्षेच्या बहारदार पकडीच्या खेळामुळे डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूलने ४२-३५ अशी बाजी मारत अजिंक्यपदाला गवसणी घातली. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीत मारवाडी हायस्कूलने शारदाश्रम विद्यामंदिर मराठी शाळेचा ३३-२६ असा तर डॉ. अँटोनियो दा सिल्वा हायस्कूलने गौरीदत्त मित्तल हायस्कूलचा ४६-३८ असा पराभव केला. स्पर्धेमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार ऋषिकेश खेडेकरने, उत्कृष्ट चढाईचा पुरस्कार मोहित शर्माने तर उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार यश राक्षेने पटकाविला.

- Advertisement -

शालेय मुलींच्या निर्णायक सामन्यामध्ये होली क्रॉस हायस्कूलच्या अष्टपैलू ऋतुजा परब व आचल वर्मा यांच्या आक्रमक चढाया रोखण्यात के.एम.एस. डॉ. शिरोडकर हायस्कूलच्या मुलींना शेवटपर्यंत अपयश आले. परिणामी होली क्रॉस हायस्कूलने मध्यंतराची ३५-५ अशी आघाडी वाढवून अखेर ५१-९ असा मोठा विजय संपादन केला आणि अंतिम विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. उपांत्य सामन्यात डॉ. शिरोडकर हायस्कूलने सोशल सर्व्हिस लीग हायस्कूलवर ३९-३६ अशी तर होली क्रॉस हायस्कूलने आय.ई.एस. नाबर गुरुजी हायस्कूलवर ३३-६ अशी मात केली. स्पर्धेमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार ऋतुजा परबने, उत्कृष्ट चढाईचा पुरस्कार आचल वर्माने तर उत्कृष्ट पकडीचा पुरस्कार डॉ.शिरोडकर हायस्कूलच्या निधी कांबळेने मिळविला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -