घरक्रीडाArchery World Cup : दीपिका कुमारी सुवर्णपदकांच्या हॅटट्रिकसह वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल; शरद पवारांनी केले कौतुक

Archery World Cup : दीपिका कुमारी सुवर्णपदकांच्या हॅटट्रिकसह वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल; शरद पवारांनी केले कौतुक

Subscribe

दीपिकाने तिरंदाजी वर्ल्डकपच्या तिसऱ्या टप्प्यात महिला एकेरी, सांघिक आणि मिश्र दुहेरीमध्ये सुवर्णपदक जिंकले.

भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने तिरंदाजी वर्ल्डकपच्या तिसऱ्या टप्प्यात तीन सुवर्णपदकांची कमाई केली. या दमदार कामगिरीच्या जोरावर दीपिकाने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. रांचीची रहिवासी असणाऱ्या २७ वर्षीय दीपिकाने २०१२ मध्ये पहिल्यांदा जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान मिळवले होते. रविवारी दीपिकाने तिरंदाजी वर्ल्डकपच्या तिसऱ्या टप्प्यात महिला एकेरी, सांघिक आणि मिश्र दुहेरी या तीन स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ‘या कामगिरीमुळे दीपिका सोमवारी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावेल,’ असे जागतिक तिरंदाजी संघटनेने ट्विट केले होते.

शरद पवारांनी केले कौतुक

दीपिकाच्या वर्ल्डकपमधील या कामगिरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले. ‘तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये सुवर्णपदकांची हॅटट्रिक केल्याबद्दल आणि या कामगिरीमुळे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावल्याबद्दल दीपिका कुमारीचे अभिनंदन. तुझ्या या यशाचा भारताला अभिमान आहे. तू पुढेही असेच यश मिळवत राहा ही सदिच्छा,’ असे शरद पवार त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.

- Advertisement -

एकाच दिवशी तीन सुवर्णपदके

तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये रविवारी दीपिकाने सर्वात आधी अंकिता भक्त आणि कोमालिका बारी यांच्यासोबत मिळून महिला रिकर्व्ह सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तिने तिचा पती अतानू दाससोबत खेळताना हॉलंडच्या जेफ वॅन डेन बर्ग आणि गॅब्रिएल श्लोएशर या जोडीचा ५-३ असा पराभव करत मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. तसेच महिला एकेरीच्या रिकर्व्ह प्रकारातील अंतिम फेरीत दीपिकाने रशियाच्या एलेना ओसिपोव्हाला ६-० असे पराभूत करत सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -