बेअरस्टो-रॉय जोडीला रोखण्याचे आव्हान!

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक लँगर यांचे उद्गार

इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी यंदाच्या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. या दोघांनी विश्वचषकात ८४.८ च्या सरासरीने भागीदारी केली आहे. त्यांनी साखळी सामन्यांत ३ शतकी भागीदार्‍या केल्या. विशेष म्हणजे, रॉय दुखापतीमुळे ज्या सामन्यांना मुकला, त्यापैकी २ सामने इंग्लंडला गमावावे लागले. या दोघांनी मागील दोन्ही सामन्यांत शतकी भागीदारी केली आहे आणि बेअरस्टोनेही दोन्ही सामन्यांत शतके लगावली आहेत. क्रिकेट विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी आम्हाला इंग्लंडच्या सलामीच्या जोडीला रोखणे महत्त्वाचे आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी व्यक्त केले.

रॉय संघात नसताना इंग्लंडने सामने गमावले याचे आश्चर्य नाही. आमच्या संघातही स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, मिचेल स्टार्कसारखे खेळाडू नसताना सामने जिंकणे अवघड झाले होते. जेव्हा तुमचे सर्वोत्तम खेळाडू संघात असतात, तेव्हा संघाचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो. या विश्वचषकात इंग्लंड हा सर्वात संतुलित आणि सर्वात चांगला संघ आहे असे मी आधीही म्हणालो आहे. त्यांनी मागील काही वर्षांत अफलातून कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करणे सोपे जाणार नाही. आमचे गोलंदाज सुरुवातीपासूनच धावा रोखण्यासाठी नाही, तर विकेट्स मिळवण्यासाठी गोलंदाजी करतात. बेअरस्टो आणि रॉय या जोडीने इंग्लंडच्या चांगल्या कामगिरीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी आम्हाला या जोडीला रोखण्याचे आव्हान असेल, असे लँगर म्हणाले.

विश्वचषकाचा दबाव वेगळाच
यंदाच्या विश्वचषकात धावांचा पाठलाग करणार्‍या संघांना फारसे यश मिळालेले नाही. याला कारण खेळपट्ट्या किंवा वातावरणापेक्षा विश्वचषकाचा दबाव असू शकेल, असे जस्टिन लँगर यांना वाटते. ते म्हणाले, मागील काही वर्षांत दुसरी फलंदाजी करणार्‍या संघांना बरेच यश मिळाले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दुसरी फलंदाजी करण्याला कर्णधार पसंती देत होते, पण या विश्वचषकात तसे झालेले नाही. याला कारण खेळपट्टी किंवा वातावरणापेक्षा विश्वचषकाचा दबाव असू शकेल. धावांचा पाठलाग करताना संघ लवकर विकेट्स न गमावण्यासाठी सावध फलंदाजी करतात आणि त्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढतो.