मुंबईकरांचा खडूसपणा दिसून आला!

फलंदाजी प्रशिक्षक राठोडचे विधान

फलंदाजी प्रशिक्षक राठोडचे विधानमुंबईकर फलंदाज रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी १८५ धावांची अभेद्य भागीदारी केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताची ३ बाद २२४ अशी धावसंख्या होती. भारताने पहिल्या तीन विकेट्स झटपट गमावल्याने रोहित आणि रहाणेने सुरुवातीला सावधपणे फलंदाजी केली. मात्र, खेळपट्टीवर काही काळ घालवल्यानंतर त्यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. आपली विकेट सहजासहजी न गमावण्याच्या वृत्तीमुळे मुंबईचे फलंदाज खडूस म्हणून ओळखले जातात. रोहित आणि रहाणे या मुंबईकरांनी खडूसपणा दाखवून दिला, असे विधान भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी केले.

रोहित आणि रहाणे या मुंबईकरांनी खडूसपणा दाखवून दिला. आता यात थोडा बदल झाला आहे. आता मुंबईकर फलंदाज वेगवेगळे फटके मारू लागले आहेत. मुंबई आता बरेच आक्रमक फलंदाज घडवत आहे. मात्र, मुंबईव्यतिरिक्त भारताच्या इतर भागांतही आता अप्रतिम फलंदाज घडत आहेत. त्यामुळे रोहित-रहाणेने केलेल्या भागीदारीकडे आम्ही मुंबईकर फलंदाजांनी केलेली भागीदारी म्हणून पाहत नाही, असे राठोड म्हणाले.

रोहितने पहिल्या दिवशी नाबाद ११७ धावा केल्या. हे त्याचे या मालिकेतील तिसरे शतक होते. रोहितच्या या कामगिरीविषयी राठोड म्हणाले, रोहित खूप अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या तंत्रामध्ये बदल करण्याची अजिबातच गरज नव्हती. कसोटीत यशस्वी होण्यासाठी त्याला केवळ आपल्या योजनांमध्ये थोडा बदल करण्याची गरज होती आणि ते त्याने केले. त्याच्यासारख्या खेळाडूने क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात खेळले पाहिजे. त्याला सलामीवीर म्हणून खेळवणे हा योग्य निर्णय होता. रोहितसारखा फलंदाज जेव्हा डावाच्या सुरुवातीला चांगला खेळतो, तेव्हा भारतीय संघाचा फायदा होतो.