IPL : आमचा संघ जेतेपदाचा दावेदार, खेळाडूंचा अनुभव ठरेल उपयुक्त -वॉटसन   

रैना, हरभजन यांच्या अनुपस्थितीतही सीएसके चांगली कामगिरी करेल असे वॉटसनला वाटते.   

shane watson
शेन वॉटसन

आमच्या संघात बरेच अनुभवी खेळाडू असून आम्ही यंदा आयपीएल नक्कीच जिंकू शकतो, असे मत चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) अष्टपैलू शेन वॉटसनने व्यक्त केले. मुंबई इंडियन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ (४ वेळा अजिंक्य) असला तरी सीएसकेचा संघ (३ वेळा अजिंक्य) त्यांच्यापेक्षा फार मागे नाही. यंदा सुरेश रैना आणि हरभजन सिंग या सीएसकेच्या अनुभवी खेळाडूंनी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीतही सीएसके चांगली कामगिरी करेल याची वॉटसनला खात्री आहे.

‘ही’च गोष्ट आमच्या पथ्यावर पडेल

आमच्या संघात बरेच अनुभवी खेळाडू आहेत. ज्या खेळाडूच्या गाठीशी बराच अनुभव असतो, तो अगदी पहिल्या सामन्यापासून संयम राखून चांगला खेळ करू शकतो. हीच गोष्ट आमच्या पथ्यावर पडेल असे मला वाटते. आमच्या संघातील खेळाडूंचा अनुभव आणि त्यांच्यातील क्षमता लक्षात घेता, आमचा संघ यंदा आयपीएल स्पर्धा जिंकण्यासाठी नक्कीच दावेदार आहे, असे वॉटसन म्हणाला.

सीएसकेने माझ्यावर विश्वास दाखवला

वॉटसनने मागील मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबईविरुद्ध ८० धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. अंतिम सामन्याआधी मात्र वॉटसनला चांगला खेळ करता आला नव्हता. परंतु, सीएसकेने त्याला एकदाही संघातून वगळले नाही. याबाबत त्याने सांगितले की, मी याआधी ज्या संघांमधून खेळलो होतो, त्यांनी मला खराब कामगिरीमुळे संघाबाहेर काढले असते. मात्र, सीएसकेने माझ्यावर विश्वास दाखवला. केवळ उत्कृष्ट कर्णधार आणि प्रशिक्षकच हे करू शकतात.

‘हा’ खेळाडू घेऊ शकेल रैनाची जागा

सीएसकेचा प्रमुख फलंदाज सुरेश रैना यंदा आयपीएलमध्ये खेळणार नाही. वॉटसनच्या मते या संघात एक अनुभवी फलंदाज आहे, जो रैनाच्या जागी खेळू शकेल. तो फलंदाज म्हणजे मुरली विजय. याबाबत वॉटसन म्हणाला की, आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रैनाचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे त्याची जागा कोणीही घेणे अवघड आहे. युएईतील खेळपट्ट्या या फिरकीला अनुकूल असतील आणि रैना फिरकीविरुद्ध अगदी सहजपणे धावा करतो. त्यामुळे त्याची उणीव आम्हाला नक्कीच भासेल. मात्र, आमच्याकडे मुरली विजयसारखा अनुभवी फलंदाज आहे, जो रैनाच्या जागी खेळू शकेल. विजय संधीसाठी वाट पाहत आहे.