घरक्रीडाकोहली, स्मिथचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा!

कोहली, स्मिथचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा!

Subscribe

डेविड वॉर्नरचे मत

भारताचा विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम दोन फलंदाज मानले जातात. कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, तर स्मिथची खासकरुन कसोटी क्रिकेटमधील कामगिरी फारच अप्रतिम आहे. त्यामुळे या दोघांमध्ये ‘बेस्ट’ कोण याबाबत सतत चर्चा रंगत असते. कोहली आणि स्मिथ हे दोघेही उत्कृष्ट फलंदाज असून आपापल्या संघांसाठी खूप महत्त्वाचे आहेत असे मत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने व्यक्त केले. तसेच या दोघांचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे असेही वॉर्नरला वाटते.

विराटची जिद्द आणि धावा करण्याची भूक ही स्मिथपेक्षा वेगळी आहे. स्मिथ फार गंभीरपणे विचार करत नाही. तो खेळपट्टीवर जातो, चेंडू त्याच्या बॅटच्या मधोमध लागतो, तो याचा आनंद घेतो आणि काहीही झाले तरी त्याला बाद व्हायचे नसते. विराटलाही बाद व्हायला आवडत नाही. मात्र, विराटला एक गोष्ट माहीत आहे की, तो जर खेळपट्टीवर टिकला, तर तो वेगाने बर्‍याच धावा करु शकतो. तो गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इतर फलंदाजांना धावा करणे सोपे जाते. भारतीय संघात बरेच खेळाडू आहेत जे आक्रमक शैलीत फलंदाजी करू शकतात, असे वॉर्नरने सांगितले.

- Advertisement -

कोहली आणि स्मिथचा क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असला तरी या दोघांमध्ये बरेच साम्यही आहे असे वॉर्नरला वाटते. ते दोघेही मानसिकदृष्ट्या खूप कणखर आहेत आणि त्यांच्यात धावा करण्याची मानसिक क्षमता आहे. त्या दोघांनाही फलंदाजी करायला खूप आवडते. ते त्यांच्या संघाला स्थिरता देतात. त्यांच्यामुळे संघातील आत्मविश्वास वाढतो. ते जर लवकर बाद झाले, तर इतर खेळाडूंवर दबाव येतो, असे वॉर्नरने नमूद केले.

लोकांना चुकीचे ठरवायचे असते!
डेविड वॉर्नर हा आक्रमक वृत्तीचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. लोक त्याच्यावर बर्‍याचदा टीकाही करतात. त्यामुळे त्याला फलंदाजी करताना लोकांना चुकीचे ठरवायचे असते. विराट आणि माझ्यात साम्य आहे. आम्ही जेव्हा फलंदाजीला उतरतो, तेव्हा आम्हाला लोकांना चुकीचे ठरवायचे. मी समजा विराटविरुद्ध खेळत असेन, तर मी विचार करतो, ‘मी त्याच्यापेक्षा जास्त धावा करणार, मी चेंडू त्याच्याकडे मारून वेगाने धाव पूर्ण करणार’. तुम्ही दुसर्‍या खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करता. या जिद्दीमुळेच मी सातत्यपूर्ण कामगिरी करू शकतो, असे वॉर्नरने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -