घरक्रीडाFrench Open : नोवाक जोकोविचची विजयी सुरुवात; सँडग्रेनवर सरळ सेटमध्ये मात

French Open : नोवाक जोकोविचची विजयी सुरुवात; सँडग्रेनवर सरळ सेटमध्ये मात

Subscribe

फ्रेंच ओपनमध्ये पहिल्या फेरीतील हा जोकोविचचा सलग १७ वा विजय ठरला.

सर्बियाच्या नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेची विजयी सुरुवात केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोकोविचने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या टेन्यस सँडग्रेनवर ६-२, ६-४, ६-२ अशी सरळ सेटमध्ये मात केली. रात्रीच्या सत्रात झालेला हा पुरुष एकेरीतील पहिलाच सामना ठरला. फ्रांसमध्ये रात्री ९ वाजेनंतर असलेल्या कर्फ्यूमुळे या सामन्यात प्रेक्षकांना परवानगी नव्हती. परंतु, प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवायही जोकोविचने उत्कृष्ट खेळ करत सरळ सेटमध्ये हा सामना जिंकत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जोकोविचला मागील वर्षीच्या अंतिम सामन्यात राफेल नदालने पराभूत केले होते. त्यामुळे यंदा दमदार पुनरागमन करत १९ वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावण्यास जोकोविच उत्सुक आहे.

पहिल्या फेरीत सलग १७ वा विजय 

जागतिक क्रमवारीत ६६ व्या स्थानी असलेल्या सँडग्रेनविरुद्धच्या पहिल्या फेरीतील सामन्यात जोकोविचने सुरुवातीपासून चांगला खेळ केला. त्याने या सामन्यात सँडग्रेनची सर्व्हिस तब्बल पाच वेळा मोडली. सँडग्रेनने दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचला काहीशी झुंज दिली. परंतु, जोकोविचने उत्कृष्ट खेळ करत हा सामना ६-२, ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये जिंकत दुसरी फेरी गाठली. फ्रेंच ओपनमध्ये पहिल्या फेरीतील हा जोकोविचचा सलग १७ वा विजय ठरला. आता दुसऱ्या फेरीत त्याच्यापुढे उरुग्वेच्या पाब्लो क्यूवासचे आव्हान असेल.

- Advertisement -

राफेल नदालची आगेकूच  

तसेच स्पेनचा स्टार टेनिसपटू आणि फ्रेंच ओपनमधील सर्वात यशस्वी खेळाडू राफेल नदाललाही विजयी सलामी देण्यात यश आले. तिसऱ्या सीडेड नदालने ऑस्ट्रेलियाच्या अलेक्सी पोपीरीनचा ६-३, ६-२, ७-६ (७-३) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तसेच माटेयो बेरेटिनीने जपानच्या तारो डॅनियलवर ६-०, ६-४, ४-६, ६-४ अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -