Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा IND vs SL : युवा टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरीसाठी सज्ज!

IND vs SL : युवा टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरीसाठी सज्ज!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळला जाणार आहे.

Related Story

- Advertisement -

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला रविवारपासून सुरुवात होणार असून पहिला एकदिवसीय सामना कोलंबो येथे खेळला जाईल. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे प्रमुख खेळाडू आगामी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सध्या इंग्लंडमध्ये आहेत. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनच्या नेतृत्वात बऱ्याच नवख्या खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे. यावर्षी टी-२० वर्ल्डकप होणार असल्याने या युवा खेळाडूंचे दमदार कामगिरी करत या स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवण्याचे लक्ष्य असेल.

धवनच्या साथीने पृथ्वी शॉ सलामीला 

श्रीलंकन संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकदिवसीय मालिका पाच दिवसांनी पुढे ढकलण्यात आली. आता रविवारपासून सुरु होत असलेल्या या मालिकेसाठी कर्णधार धवन, उपकर्णधार भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचे संघातील स्थान निश्चित आहे. परंतु, इतर जागांसाठी बरीच स्पर्धा आहे. धवनच्या साथीने मुंबईकर पृथ्वी शॉ भारताच्या डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल या सलामीवीरांपैकी एकाला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकेल.

हार्दिक गोलंदाजी करणार?

- Advertisement -

तसेच मधल्या फळीत भारताकडे सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा आणि हार्दिकचा पर्याय आहे. हार्दिक पाठीवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर सातत्याने गोलंदाजी करू शकलेला नाही. त्यामुळे आता श्रीलंकेविरुद्ध तो गोलंदाजी करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यष्टीरक्षक म्हणून भारताला संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. गोलंदाजीत लेगस्पिनर युजवेंद्र चहल आणि चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीला बऱ्याच वर्षांनी एकत्र खेळण्याची संधी मिळू शकेल.

प्रतिस्पर्धी संघ – भारत : शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

- Advertisement -

श्रीलंका : दसून शानका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निशंका, चरिथ असलांका, वानिंदू हसरंगा, अशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणरत्ने, चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरण फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरू कुमारा, इसुरू उदाना, बिनुरा फर्नांडो.

सामन्याची वेळ : दुपारी ३ पासून; थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisement -