घरक्रीडाIND vs ENG 3rd Test : पुजाराचे १२ डावांनंतर अर्धशतक; आशियाबाहेर केली...

IND vs ENG 3rd Test : पुजाराचे १२ डावांनंतर अर्धशतक; आशियाबाहेर केली विक्रमी कामगिरी

Subscribe

पुजाराचे हे कसोटी कारकिर्दीतील ३० वे अर्धशतक ठरले.

भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजाराला मागील काही काळात चांगली कामगिरी करता आलेली नाही. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही तो मोठी खेळी करू शकला नव्हता. परंतु, तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने कामगिरीत सुधारणा केली. त्याने तब्बल १२ डावांनंतर अर्धशतकी खेळी केली. संथ गतीने आणि सावध शैलीत खेळत असल्याची पुजारावर वारंवार टीका होते. मात्र, हेडिंग्ले येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने धावांची गती काहीशी वाढवली. त्याने ९१ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे आशियाबाहेरील सर्वात जलद अर्धशतक ठरले.

पुजारावर होते दडपण 

या सामन्यात भारताचा पहिला डाव ७८ धावांवर आटोपला होता. याचे उत्तर देताना इंग्लंडने पहिल्या डावात ४३२ धावांची मजल मारत त्रिशतकी आघाडी मिळवली होती. त्यातच दुसऱ्या डावात भारताचा फॉर्मात असलेला सलामीवीर लोकेश राहुल अवघ्या ८ धावांवर बाद झाल्याने पुजारावरील धावा करण्याचे दडपण अधिकच वाढले होते. परंतु, त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने २८ चेंडूत २२ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने संयमाने फलंदाजी करत रोहित शर्माला (५९) चांगली साथ दिली. या दोघांनी ८२ धावांची भागीदारी रचली.

- Advertisement -

कसोटी कारकिर्दीतील ३० वे अर्धशतक

पुजाराने डावातील ५१ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील ३० वे अर्धशतक ठरले. पुजाराने याआधीचे अर्धशतक हे १२ डावांपूर्वी इंग्लंडविरुद्धच केले होते. चेन्नईत झालेल्या कसोटीत त्याने १४३ चेंडूत ७३ धावांची खेळी केली होती. तसेच मागील कसोटीत पुजाराचे अर्धशतक पाच धावांनी हुकले होते. परंतु, त्याने आता हा अर्धशतकाचा दुष्काळ संपवला.

- Advertisement -

हेही वाचा – पहिल्या दिवसानंतर खेळपट्टीमध्ये खूप बदल झाला


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -