पावसाळ्यानंतर आयपीएल?

राहुल जोहरींनी वर्तवली शक्यता

करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरातील बहुतांश खेळ बंद असून क्रिकेटही याला अपवाद नाही. जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा आयपीएलचा यंदाचा मोसम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. मात्र, आता हळूहळू पुन्हा क्रिकेट सुरू करण्याबाबत चर्चा होत आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. परंतु, सध्याच्या परिस्थितीत हा विश्वचषक होण्याबाबत साशंकता आहे. टी-२० विश्वचषक लांबणीवर पडल्यास किंवा रद्द झाल्यास या काळात आयपीएल होऊ शकेल असे म्हटले जात आहे. आता बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनीही काहीसे असेच विधान केले आहे.

मागील वर्षी लोकसभा निवडणुकीत मतदान करणार्‍या लोकांपेक्षा आयपीएलचे सामने पाहणार्‍यांची संख्या मोठी होती. प्रायोजकांसाठी क्रिकेट ही एक शिडी आहे आणि त्यांना यामुळे इतर ठिकाणी पैसे मिळवणे सोपे होईल. परिस्थिती पूर्ववत होण्यास वेळ लागेल यात शंका नाही. लगेच उद्या स्थिती पूर्वीप्रमाणे होईल अशी तुम्ही अपेक्षा करू शकत नाही. आयपीएलची सर्वोत्तम बाब म्हणजे जगभरातील आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत खेळतात. आता या स्पर्धेत खेळायचे की नाही, याचा निर्णय घेण्याचा खेळाडूंना अधिकार आहे. त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करू. प्रवासावरील निर्बंध उठल्यानंतर प्रत्येक खेळाडूला खेळण्याआधी क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. याचा वेळापत्रकावर कसा परिणाम होतो हे आम्हाला पाहावे लागेल. मात्र, आम्ही सकारात्मक विचार करत आहोत. पावसाळ्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल अशी आम्हाला आशा आहे. त्यानंतर आम्ही आयपीएलबाबत विचार करू, असे जोहरी म्हणाले.