घरक्रीडाविश्वचषकासाठी केदार फिट!

विश्वचषकासाठी केदार फिट!

Subscribe

आयपीएलमध्ये खेळताना भारताचा अष्टपैलू केदार जाधवच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आगामी विश्वचषकालाही मुकेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, तो विश्वचषकापर्यंत फिट होणार असल्याची आता माहिती मिळत आहे. त्यामुळे तो या विश्वचषकात भारत आपल्या सर्वोत्तम संघासह मैदानात उतरू शकणार आहे.

काही दिवसांपूर्वीच संपलेल्या आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या साखळी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना केदारच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आयपीएलच्या उर्वरित सामन्यांत खेळता आले नाही. या दुखापतीमुळेच केदारच्या विश्वचषकातील सहभागाबाबत प्रश्न निर्माण झाले होते. भारतीय संघाचे फिजीओ पॅट्रीक फरहात यांनी ही दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, दुखापत सावरण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे संघ व्यवस्थापन चिंतेत होते.

- Advertisement -

मागील आठवड्यात केदार आणि फिजीओ पॅट्रीक मुंबईत एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथे केदारचे सर्व सत्र पार पडले. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षण केंद्रात केदारची फिटनेस चाचणी झाली होती. केदार फिट असल्याचा अहवाल पॅट्रीक यांनी बीसीसीआयला दिल्यामुळे त्याच्या विश्वचषकातील सहभागावर सुरू असणारी चर्चा थांबली आहे. केदार या स्पर्धेपूर्वी फिट न झाल्यास त्याच्या जागी अंबाती रायडू किंवा रिषभ पंत यांना संघात स्थान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, केदार फिट होणे ही भारतासाठी आनंदाची बातमी आहे.

कारण, मागील १-२ वर्षांत त्याने भारतीय संघातील आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज आणि कामचलाऊ फिरकीपटू म्हणून त्याने चांगली कामगिरी बजावली आहे. त्याने आतापर्यंत ५९ एकदिवसीय सामने खेळले असून, त्यात त्याने ४३.५० च्या सरासरीने ११७४ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने २७ विकेटही मिळवल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -