MS Dhoni : धोनीच्या आई- वडीलांना कोरोनाची लागण, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

आई वडील पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांची कोरोना टेस्ट केली जात आहे.

Mahendra Singh Dhoni Mother Father found COVID Positive in Ranchi
MS Dhoni : धोनीच्या आई- वडीलांना कोरोनाची लागण, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या आई वडीलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे वडील पानसिंह धोनी आणि आई देवकी धोनी यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिस्ट रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु आहेत. महेंद्रसिंह धोनी सध्या चेन्नईच्या संघासह आयपीएल (IPL 2021) मध्ये व्यस्त असून आई वडीलांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वेगाने पसरतोय. वाढत्य रुग्णसंख्येमुळे झारखंड सरकारनेही लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान धोनीच्या आई – वडीलांची प्रकती स्थिर असून घाबरण्याचे कारण नाही. दोघांच्याही शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य असून त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये दोघांचीही प्रकृती ठणठणीत होईन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येतील असा विश्वास पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

मुंबईत पार पडणाऱ्या कोलकत्ता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात धोनी आज चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान २०२० मध्ये पार पडलेल्या आयपीएलनंतर धोनी आपल्या कुटुंबियांसह व्यस्त होता. अगदी यंदाचा आयपीएल सीझन सुरु होईपर्यंत धोनी क्रिकेटपासून दूर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबियांना देत होता.

आयपीएल सुरु होईपर्यंत गेली चार महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर मार्च महिन्यात धोनी चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या सराव शिबिरासाठी मुंबईत दाखल झाला. त्यानंतर सात दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर संघ मैदानात उतरला. त्यामुळे कुटुंबियांशी संपर्कात आला नव्हता. मात्र आई वडील पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांची कोरोना टेस्ट केली जात आहे.